सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ झूल ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
आनंदाची झूल हवी
हर एक त्या जीवाला
श्वासा संगे यातायात
घडे टाकून मनाला
तुडविता गं फुलांना
धावू नये वाटेवरी
सजवेल कोण झूल
तुजसाठी या भूवरी
मखमली झुल लाभे
असामान्य कर्तुत्वाला
सन्मान त्यांचाच होई
जागवितो, जो सत्याला
अंतरीचे प्रेम धागे
विणता झूल मोहवि
मनीची सद् भावना
आदराने गं फुलवी
रंग खोटे, झूलीवरी
काळासंगे विरणारी
अशी झूल नको देवा
गर्व तो जोपासणारी
पीडितांचा हात हाती
हरक्षणी देता साथ
निर्मळ आनंद होई
झूल पांघरी श्रीनाथ
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈