श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ भाग्य उजळले आज अकल्पित… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
स्वप्नालाही नव्हते माहित ।
भाग्य उजळले आज अकल्पित ॥
???
कोरांटीच्या झाडावरले —
दुर्लक्षित मी फूल एकले —
पांथस्थाने कुण्या तोडिले —
श्रीहरिचरणी मला वाहिले —
चरणस्पर्शे तनु रोमांचित —
सार्थक झाले जीवित संचित —
नकळत अायु झाले पूनित —
भाग्य उजळले अाज अकल्पित ॥
भाग्य उजळले आज अकल्पित ॥॥
???
हीनदीन मी शीळा पार्थिव —
कैक युगांचे जीवन निर्जिव —
अतर्क्य घडले काहि अवास्तव —
लाभे दैवत्वाचे वैभव ॥
शिल्पकार कुणि येई धुंडित —
घेउनिया जादूचे हात —
अमूर्तातुनी झाले मूर्त —
अवतरला साक्षात भगवंत —
भाग्य उजळले आज अकल्पित ॥
?️?️?️
वाटसरू कुणि ये मार्गावर —
मूर्त पाहाता जोडुनिया कर —
फूल हातिचे कोरांटीचे —
वाहुनि गेला मम चरणांवर ॥
???
मीच वाटसरु शिल्पकार मी —
कोरांटीचे फूल स्वये मी —
शीळाही अन् मूर्तिही मी —
स्थूलात मी सूक्ष्मात मी ॥
☘️☘️☘️
शुभदिवसाच्या मंगल समयी —
मी तू पणही लयास जाई —
द्वैताचे घडले अद्वैत —
भाग्य उजळले आज अकल्पित ॥
भाग्य उजळले आज अकल्पित ॥॥
???
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈