प्रा.सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ तू बांध ना रे झुला … ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
प्राजक्ताच्या फुलांनी तू न्हाऊ घाल मला
कदंबाच्या झाडाखाली झुलव तू मला झुला ….
झुल्यावर झुलव तू प्रेमाने पाहिन
माझ्या डोळ्यामध्ये मीच तुला झुलविन
डोळ्यातच घर तुझ्या बांधीन रे मला …
कदंबाच्या ….झुला….
जाईजुई चाफ्याचे रे बांधू या तोरण
हातामध्ये हात घेऊ गाऊ चल गाणं
प्रेम आपले साजरे सजव तू मला
कदंबाच्या ….झुला….
कृष्ण सखा माझा तू रे मी तुझी राधा
झाली पहा तुझी मला पहा प्रेम बाधा
चंद्र सूर्य ते साक्षिला घेऊ चला चला
कदंबाच्या ….झुला…..
स्वप्न पाहू सुंदर ते आभाळाचे निळे
जन सारे म्हणतील आपल्याला खुळे
स्वर्ग माझ्या बोटावर सांगू कसे तुला
कदंबाच्या ……झुला….
प्रेम रसात डुंबता स्वर्ग हाती येई
केशराच्या शेतात ते घर बांधू नवलाई
वास्तवाच्या जगातून नेई दूर मला
कदंबाच्या झाडाखाली……
झुलव तू मला झुला…..
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: १५/०८/२०२०, वेळ:रात्री: १०/२५
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
“प्रेम ही भावनाच किती सुंदर आहे …. खरं तर स्त्रीच भाव विश्र्व ह्या भौतिक जगातल्या पलिकडच…. तिला प्रेमानी झुलवायला , नको ते बँकांचे कर्ज …. व्यवहार करावा वर्ज ………द्यावा एक प्रेमाचा अर्ज….” सुदंर कविता सुमती ताई.