कवितेचा उत्सव
☆ तुझा पंथ गे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
तुझा पंथ गे तुला मोकळा
माझ्यामार्गे मला जाउ दे
कोसळेल जे अभाळ सारे
प्राणावरती मला वाहु दे !
प्राणसखा तो तुटला तारा
माझ्यासाठी विझले अंबर
अग्निहोत्र हे जीवन आता
धुमसत राहिल माझे अंतर !
रुतून राहिल गच्च उरी ही
मंतरलेली सुरी दुधारी
प्राणांतिक काळीज कळवळो
जखम वाहती ठेविन मी ही !
लाल लाल अन् कभिन्नकाळी
वाहत राहिल धारा झुळझुळ
येउन मिळतिल स्रोत आंधळे
गात विराणी खळखळ खळखळ !
विस्तारत मी जाइन तेंव्हा
डोह आंधळा अथांग होइन
दीपकळी पण अपुली हळवी
तरंगात मी तेवत ठेविन !
वाळुरणीही असेल बरसत
तव स्मरणांची रिमझिम सखये
जरी जाहलो बेपत्ता मी
तुलाच शोधित असेन सखये !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈