सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ षड् रिपु…..☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
षड्रिपुनी भरलेला माझा,
मोह घडा हा शिरावरी !
अडखळत पाऊल पडते,
कधी डचमळते या उरी!
कधी वाटते ओतून द्यावे,
मोहाचे क्षणभंगुर पाणी!
कधी मनी ही भरून राहती,
मदमोहाची मोहक गाणी!
काम, क्रोध, भय,मत्सर सारे,
सतत मानवा मनी छळती!
मिळेल कधी का सुटका त्यातून,
प्रार्थीते ईश्वरा माझी मती!
या फेऱ्यातून सुटका नाही,
प्रयत्न करावा परी साचा !
तव भक्ती विण हाती न काही,
सार्थकी लावू जन्म मानवाचा!
© सौ. उज्वला सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈