☆ कवितेचा उत्सव ☆ कोंदण ☆ सुश्री पूजा दिवाण ☆
सळसळत्या पानांवर लिहिती
थेंब थेंब सृजनाची नक्षी
गर्द राईच्या हिरवाई सह
शांत-निवांत मनाचा पक्षी
तू न कुणाचा मी न कुणाची
स्नेह परी मग कसा जुळे हा
आयुष्याच्या वळणावरती
कसा घुमे हा मैत्र पारवा
किती पाहिली नवलाई अन्
किती साधले गप्पांचे क्षण
खळाळत्या हास्याच्या संगे
आठवणींचे मखमाली क्षण
मैत्र जीवांचे असे जुळावे
सहवासाचे मोती व्हावे
दिल्या घेतल्या आनंदाचे
त्या मोत्याला कोंदण व्हावे
© सुश्री पूजा दिवाण
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर कविता.