सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ कवितेचा उत्सव ☆ मध्यमवर्ग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
यावेळचा पाऊस
खूप खूप मोठ्ठा होता.
काऊचं शेणाचंच नव्हे, तर
चिऊचं मेणाचं घरही वाहून गेलं.
काऊ चिऊकडे धावला
मदत मागायला.
पण चिऊ स्वतःच झाली होती बेघर.
काऊ गेला परत, विचार करत
आता काय करू?
कोणा हाक मारू?
तोच काऊकडे आला कोणी
घेऊन बिस्कीटे -चहापाणी.
दुसरा आला खिचडी घेऊन
तिसरा आला कपडे घेऊन
एकेकजण येतच गेला
काऊला मदत देतच गेला
काऊ रिलिजियसली रांगेत उभा.
कधी रॉकेलच्या
कधी अंथरुणाच्या
कधी कपड्यांच्या
कधी पांघरुणांच्या
हळूहळू काऊचं घर उभं राहिलं.
चिऊकडे कोणीच नाही आलं
रांगेत उभं राहणं, नव्हतं
तिच्या प्रतिष्ठेला शोभणारं
जवळच्यांनी केली मदत प्रथम
नंतर चिऊलाच ऑकवर्ड वाटू लागलं,
रोज रोज त्यांची मदत घ्यायला.
त्यांनाही वाटायचं हिला विचारलं
तर हिचा इगो दुखावणार नाही ना?
उगीच रिलेशन्स नको स्पॉईल व्हायला.
चिऊला वाटायचं, कसं मागू?
शरमेने भरून जायचं तिचं मन.
काऊचं घर केव्हाच उभं राहिलं
-पूर्वीपेक्षाही चांगलं.
चिऊ मात्र अजून
जमवतेय काड्या काड्या
घर बांधायला.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
फोन नं. 9820206306.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈