सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ अनाथांची माई ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(हजारो अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. लक्ष लक्ष बालके पोरकी झाली. त्या माईला ही भावपूर्ण श्रद्धांजली!)
कै. सिंधुताई सपकाळ
~~~~~
अनाथांची माई
तीच ही सिंधूताई
जिणे तिचे केविलवाणे
परी डगमगली नाही
संशयी पतीने
केली मारहाण किती
फेकिले तिला गोठ्यात
नव मासांची गर्भवती
प्रसवली चिंधी गोठ्यात
गोमातेने दिधला आधार
ना सासर अथवा माहेर
ती असे एकटी निराधार
बांधले बाळ पदरात
गात फिरली आगगाडीत
शमविण्या भूक उदराची
भाजली भाकरी स्मशानात
दीपक नामक बालक
जाहली त्याची आई
हीच ती सिंधूताई
आज हजारो अनाथांची माई
पतीस ठणकावून सांगे
“नव्हे मी आता बाई,
मी सिंधूताई
समस्त अनाथांची माई”
दीप आता विझला आई
अंधार पसरला ठाई
शांती लाभो पुण्यात्म्यासी
हीच श्रद्धांजली वाही
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈