मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संक्रांत ☆ सौ. विद्या पराडकर

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संक्रांत ☆ सौ. विद्या पराडकर ☆

आली आली संक्रांत राणी

नटली चंद्रकला नेसुनी

 ले्वूनी शुभ्र हलव्याचा साज

लाजवी मोत्या लाही आज

 

तिळाची स्निग्धता, गुळाची गोडी

समरसतेने सजते बघा जोडी

संसार सागरातील‌ जणू‌ होडी

कुशलतेने वल्हवतो‌  हा नावाडी

 

प्रेमाचे तीळ‌ घेऊनी

कर्तव्याचा  गुळ घालूनी

संयमाचे जायफळ उगाळूनी

एकतेची  विलायची टाकुनी

 

सुगंध युक्त लाडू वळू या

विशाल दृष्टिचे दान देवू या

संस्कृतीचे जतन करू या

संक्रांतीला नवा अर्थ देवू या

 

लहान मोठा भेद सारूनी

समरसतेचा  मंत्र घेवूनी

स्वदेश स्वधर्माचे   पालन‌ करूनी

मानवतेचे  स्वप्न  साकारु या

मानवतेचे स्वप्न साकारु या.

 

© सौ. विद्या पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈