☆ कवितेचा उत्सव ☆ देव ☆ कवी आनंदहरी ☆
मूर्ती नाही घरी माझ्या
अंतरात देव
नाही कपाळी हो टिळा
मनात या भाव
माणसाच्या कर्मातील
देव मी पहातो
हात नाही जोडत मी
हात हाती देतो
जात नाही देवालयी
विश्व देवघर
माणसाच्या मनातील
माणूस जागर
दीन-दुबळ्यांच्यासाठी
जीव जो झटतो
सवे त्याच्या चालताना
देवचि भेटतो
© कवी आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
देवाचे नेमके दर्शन.??