सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ रेशीम गुंता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
माझे अंबर मला मिळाले
आनंदाने पंख पसरले
जोर देऊनी उडू पाहता
आपोआपच पंख मिटले
पंखानाही कळून आले
फक्त तुम्हा आभाळ मिळाले
कर्तव्याच्या रेशमी दोरांनी
पाय तुझे गुंतुन बसलेले
डोळेभरुनी आभाळ पहा तू
आपुलकीने प्रेमही कर तू
मुक्तपणाने विहरायाचे तव
ह्रदयामाजी स्वप्न दडव तू
पायामधला रेशीम गुंता
नखानखांशी गुंतत जातो
खंत तयाची करता करता
हताशतेला भक्कम करतो
म्हणून आपण आपुलकीने
जे आहे ते मान्य। करावे
नियती निर्मित रेशीम गुंत्याशी
स्नेहभारले प्रेम करावे
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈