सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ जीवन जगता जगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
मागे वळून बघताना
आठवतात क्षण संघर्षाचे
किती बोचले काटे
किती वेचले खडे संकटाचे..
पोळले कितीदा तरी
ज्यांना मानले आपले
ठेवला विश्वास निस्सीम
त्यांनीच जेव्हा फसवले…
नव्हती फार मोठी झेप
नव्हते चुंबायाचे आकाश
मूठभर सुखशांतीच्या कल्पना
वाट चालायची होती सावकाश….
सोसली निंदा ऐकले टोमणे
काळजात किती घरे पडली
नसता कसलेही कुणाचे देणेघेणे
नकळे बोलणी ही कशास साहली…
सदा वागले विवेका स्मरुन
सुविचारा नाही त्यागिले
नाही गमावला आत्मविश्वास
निर्धाराने तमास ऊजळविले…
होती कणखर रथाची दोन चाके
निभावल्या सार्या वळणवाटा
आता निवांत विसाव्याच्या क्षणी
कशास आठवाव्या सुटलेल्या जटा…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈