☆ कवितेचा उत्सव ? शोध मनातल्या मनाचा ? श्री राजेंद्र परांजपे ☆
अरे आहेस कुठे? कधीचा मी शोधतोय तुला!
माझ्यातल्या मला मी साद घालतो पुन्हा पुन्हा !
इतकी वर्ष झाली, कधीच निवांत भेटला नाहीस !
गप्पा मारू म्हंटल तर जरा जवळ बसत नाहीस !
तसं लांबूनच बघतो म्हणा, कधीकधी मी तुला !
वाटतोस जरा ओळखीचा पण खात्री नाही मला !
राहतोस तू माझ्याच मनात, कुठल्यातरी कोपऱ्यात !
पण कसं शोधू सांग, तुला मी इतक्या ह्या पसाऱ्यात?
तरीही हुडकून काढतोच कधीतरी तुला मी हिय्या करून !
आणि हिंडवतो तुला, माझ्याच कवितांच्या मखरांमधून !
पण मला माहित आहे तुझा अस्थिर, चंचल स्वभाव !
हळूच सटकतोस तिथून, आणि उंडारतोस गावोगाव !
बरेच दिवस तुला विचारीन म्हणतो, पण धीर होत नाही !
किती पेला संपला, किती आहे भरलेला, सांगशील काही ?
तुला तरी काय माहित म्हणा, तू तर माझ्यातच भरलेला !
कसा वेडा मी, विचारतोय माझ्याच मनातल्या मनाला !
© श्री राजेंद्र परांजपे
१३ मार्च २०२०
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मनाचा शोध मनापासून आवडला.