डॉ मेधा फणसळकर
कवितेचा उत्सव
☆ मधुदीप रचना… तप्त धरा ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
या
तप्त
झळांचा
पेटवला
अग्नीचा कुंड
ग्रीष्मासवे
रवीने
भला
सोडला सुस्कार धरतीने जणू अंगार
भासते रुष्ट विरहपीडिता नार
भेटण्या प्रियतमास आतुर
फेकला लाल शेला पार
पलाश वृक्षावर
क्रोध अपार
नि
पीत
सुवर्णी
कर्णफूल
झेली बहावा
कानातील
धरेचा
डूल
चैत्रात नेसली नवीन हिरवी वसने
सुरकुतली सजणाच्या विरहाने
अंगाग मृत्तिका धुसमुसळे
वेढली उष्ण धुरळ्याने
तरी करी अर्जवे
पुन्हा प्रेमाने
तो
चंद्र
प्रियेला
मनवित
संध्यासमयी
अळवितो
प्रीतीचे
गीत
रतीमदनाचा जणू हा मिलनसोहळा
पवन देतसे हलकेच हिंदोळा
चांदण्या न कुंदफुलांचा मेळा
धरेच्या ओंजळीत गोळा
तृप्त युगुल मग
मिटते डोळा
© डॉ. मेधा फणसळकर
सिंधुदुर्ग.
मो 9423019961
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈