सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
माझी माय मराठी
माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी।।ध्रु।।
कवितेसह हर्षे येते
भारुड,गवळण गाते
पोवाड्यातुनी ही रमते
ओव्यांमधुनी ती खुलते।।१।।
विश्वात कथेच्या फुलते
वास्तवास न्यायही देते
शब्दालंकारे सजते
आविष्कारातुनी नटते।।२।।
कादंबरी कधी बनते
अन शब्दांसह डोलते
भेदक,वेधक ती ठरते
सकलां काबिज करते।।३।।
सारस्वतांसी जी स्फुरते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते
विश्वाला स्पर्शही करते।।४।।
माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी।।
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈