सौ. अमृता देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “मैत्री…” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
तुझ्या एका शब्दाने
अशी जादू केली
माझं एकटेपणाचं ओझं
मला हलकं वाटू लागलं
तुझ्या एका कटाक्षाने
अशी जादू केली
माझं दुखावलेलं मन
थोडं शांत शांत झालं
काल अचानक म्हणालास
नको येऊ लागी लागी
वेड्या तुला माझे मन
कधी कळलेच नाही
ऋणानुबंधाची ही गाठ
नको म्हणून तुटत नाही
तुझ्या माझ्या मैत्रीला
अंतराचे भान नाही
तुझ्या यशाच्या कमानी
चढो आनंदाची रास
माझे मन सुखावेल
लागी असो वा असो पैस
तुझ्या नवीन जगात
जरी मला जागा नाही
मन माझे निरपेक्ष
तुला अडवत नाही
कधी आली आठवण
पहा वळून तू मागे
थेट माझ्या डोळ्यांमध्ये
तुझे प्रतिबिंब जागे.
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈