श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 101 – कळेना मानवा तुजला ☆
जरा परमार्थ जीवाचा, रुचेना मानवा तुजला।
कसा बाजार मोहाचा, कळेना मानवा तुजला।
अती धुंदीत पैशाच्या, विसरला माय बापाला।
निरागस भाव प्रेमाचा ,पचेना मानवा तुजला।
नको धावू जगी मृगजळ मना भुलवी दिखावा हा।
असा का शोध सत्याचा, लागेना मानवा तुजला।
जरी खडतर मनी भासे असा हा मार्ग सौख्याचा।
नसे कष्टाविना प्राप्ती वळेना मानवा तुजला।
दिसे सत्ता किती लोभस, मनाला ओढती फासे।
कसे हे पाश मोहाचे, तुटेना मानवा तुजला
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈