श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ पारिजात… ☆ श्रीशैल चौगुले ☆
पारिजातावर मन
रेंगाळून रेंगाळून
परिमळ दरवळ
काळजात साकळून.
दव थेंब वळवाचे
कसे भाव चिंबाळून
आभाळात इंद्रधनू
सप्तरंग सांभाळून.
दिरंगाई पाखरांची
घरट्यात हिंदोळून
कलकल हर्षनाद
रानोमाळी बिंबाळून.
सांगूनिया शब्दगुज
वारा वेडा पिसाळून
धरा प्रीत क्षितीजात
पारिजाता कवळून.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈