श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वीकारा वा नाकारा मज… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

{वृत्त: पादाकुलक}

स्वीकारा वा नाकारा मज

मलंग मी तर चंचल वारा

तुमच्या संगे तुमची नगरी

माझ्या संगे माझा तारा !

 

खुशाल वगळा वस्तीमधुनी

दिशादिशांचा मज परवाना

दरबारी मी चराचराचा

ऋतूऋतूंचा मज नजराणा!

 

एक विश्व मी माझ्यामधले

त्या विश्वाचा मी तर स्वामी

अवघे गोकुळ अंकित तुमच्या

कान्हा वेणू माझ्या धामी !

 

रोज कालच्या क्षितिजावरती

पुन्हा नव्याने उदया येतो

प्राणांची झटकून काजळी

ज्योतिर्मय मी अजून होतो !

 

खळखळ माझी वाहत वाहत

अथांग आता होऊ पाहे

गाज माझिया मौनाचीही

पार तटांच्या जाऊ पाहे !

 

कधितरि माझा अलखनिरंजन

घुमेल तुमच्या अधिराज्यातुन

होइल जागा उरि तुमच्याही

सूर आतला एक विलक्षण !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments