आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
कवितेचा उत्सव
☆ मनाचे श्लोक (निवडक) ☆ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ☆
मना,नीट पंथे कधीही न जावे
नशापाणी केल्याप्रमाणे चलावे
जरी वाहने मागुनी कैक येती
कधी ना तरी सोडिजे शांतवृत्ती!
* * *
सदा खाद्यपेयावरी हात मारी
बिले देई सारून मित्रासमोरी
“अरेरे,घरी राहिले आज पैसे-“
खिसे चाचपोनी मना बोल ऐसे !
* * *
इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी
इथे पुस्तके वा तिथे हाथकाठी
अशी सारखी भीक मागीत जावे,
स्वताचे न काही जगी बाळगावे !
* * *
जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी
उभी आणि धेंडे जिथे चार मोठी,
मना,कान दे तोंड वासून तेथे,
पहा लागतो काय संबंध कोठे !
* * *
– आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈