कवितेचा उत्सव
☆ संपले ते दिवस… ☆ मेहबूब जमादार ☆
दोघांतचं बोलू कांही
पण संपले ते दिवस
पुनव चाखल्या यौवनी
आली आता अवस
दोघांच्या मिटीत सजणे
रात्रीही भुलून गेल्या
पहाटेचा झाला इषारा
पाकळ्या फुलून गेल्या
असता मिठीत दोघे
भोवतीची नव्हती जाण
उशीरा कळले आपणां
पाखरानीं सोडले रान
कित्येक गेले दिवस
दोघानां आठव रातीचा
यौवनांत भुलूनी गेलो
अर्थ न कळे जगण्याचा
चाखली मजा ती गेली
अन यौवन सरून गेले
तळमळत्या या रातींना
बघ,सारे स्मरून गेले
सखे स्मरते सारे,पण
पाय गळाया लागले
झाली जीवनाची सांज
सरण दिसाया लागले…
– मेहबूब जमादार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈