मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी निरांजनातील वात… ☆ कै भालचंद्र गजानन खांडेकर ☆

? कवितेचा उत्सव ?

मी निरांजनातील वात… ☆ कै भालचंद्र गजानन खांडेकर ☆ 

मी निरांजनातील वात

माझ्या देवापाशी जळते हासत देवघरात

 

माझ्या प्रभूस माझी पारख

माझ्या देवाचे मज कौतुक

प्रभा प्रभूच्या सहवासाची फुलली या हृदयात

 

प्रशांत नीरव या एकान्ती

शुचिर्भूतता सारी भवती

पवित्र दर्शन सदा लोचना लाभतसे दिनरात

 

कणाकणातून प्रभा उधळिता

पटे जिण्याची मज सार्थकता

उषा फुलविता भयाण रात्री भासे

रवितेजात

 

तुमची करण्यासाठी सेवा

प्राणाहुती ही माझी देवा

प्रकाशपूजन माझे घ्या हे जे

प्राणाप्राणांत

 

मी निरांजनातील वात.

 

 – कै भालचंद्र गजानन खांडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈