श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 145
☆ पिंजऱ्याचे दार… ☆
मी कशाला बांध घालू आसवांना ?
रोखुनी का त्या धरावे यातनांना ?
बातम्यांचा पूर तसल्या रोज येतो
बांध घालू भोगवादी वासनांना
वृक्ष आहे माय-बापाहून मोठे
काळजाला घर पडावे छाटताना
जीर्ण नाही का तरीही फाटते हे ?
त्रास होतो हृदय कायम टाचताना
झोपण्याची वेळ झाली ही तरीही
पाहिला मी चंद्र रात्री जागताना
माणसांसाठीच आहे जन्म अपुला
हे अजूनी का कळेना माणसांना ?
पिंजऱ्याचे दार आता मी उघडले
हर्ष होतो पाखरांना सोडतांना
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈