सौ. कल्पना मंगेश कुंभार
कवितेचा उत्सव
☆ भास की आभास तुझा… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆
गंधाळलेले श्वास
आसपास तुझेच भास
बेधुंद बरसणारा पाऊस
अन् दरवळणारा मातीचा वास..
पाऊस सुरू झाला
की दरवर्षी असं होत
तू नसतोस कुठेही
तरीही चराचर तुझंच होत ..
चिंब भिजलेल्या क्षणांना
मग पाझर फुटतो
डोळ्यात थोपवलेला पाऊस मात्र
पापण्यातच गोठतो ..
ओठावर झरू लागते
आर्त विराणी
पाऊसही गाऊ लागतो
गजल पुराणी..
पुन्हा भारावते मन
शोधू लागते तुला
शब्दांच्या ही पलीकडे जाऊन
कवितेत गुंफते तुला..
अव्यक्त भाषा थेंबांनी
मग पाऊसच बोलू पहातो
तुझ्या माझ्या विरहाचे
आर्त स्वर छेडू पहातो..
तरीही श्वास चालूच रहातो
तुझ्याविना जगू पहातो
दूर दूर क्षितिजापल्याड
एक तारा हळूच निखळतो..
© सौ. कल्पना मंगेश कुंभार
शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी
मोबाईल : 9822038378
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈