मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

देणा-याचे हात हजारो

दुबळी माझी झोळी

” प्रपंच” 1961 सालचा हा चित्रपट. भारत सरकारने कुटुंब नियोजन मोहीम राबवणे सुरू केले होते. हम दो हमारे दो,

लाल त्रिकोण, अशा जाहिरातीनी सार्वजनिक वातावरण दणाणून गेले होते.ह्याचा प्रचार अधिकतर ग्रामीण भागात जास्त करणे आवश्यक होते.सावकारी, जप्ती, आर्थिक गरीबी, यात ग्रामीण जनता पिचून गेली होती.  पण अशाही परिस्थितीत घराघरातून दर वर्षी पाळणा हलतच असे. त्यातूनच अस्वच्छता, निकृष्ट  अन्न, व योग्य जोपासना न झाल्याने लहान मुले दगावत असत. पोलिओ, टी बी, सारखे विकार बळावले होते.

यावर कडक धोरण अवलंबून सरकारने ही मोहीम राबवली होती. जन जागृती सर्व थरांवर चालू होती.

त्यासाठीच ” प्रपंच ” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. शहरातून, खेडेगावातून, वस्त्यांवर, ग्राम पंचायतीच्या अंगणात अगदी उघड्यावर याचे प्रक्षेपण केले जात होते. मोफत असल्याने खुप गर्दी होत  असे.

या चित्रपटात काम करणारे कलाकार अस्सल काळ्या मातीतले होते. सुलोचनाताई, श्रीकांत मोघे, सीमा असे सर्वांचे आवडते कलाकार होते.

एकापेक्षा एक सुंदर गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.कारण गीतकार ग.दि.माडगूळकर, संगीतकार आणि गायक सुधीर फडके, अणि गायिका आशा भोसले.

“बैलं  तुजं हरना वानी, गाडीवान दादा ” म्हणत फेटा बांधून बैलगाडी हाकणारी आणि “आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ” म्हणत मक्याच्या शेतातून उड्या  मारत धावणारी चंपा म्हणजेच सीमा,” साळु होता कष्टाळू बाळू आपला झोपाळू” म्हणत मुलांबरोबर खेळणारा शंकर म्हणजे श्रीकांत मोघे.

त्याचे दादा वहिनी गरीब कष्टाळू, देवभोळे साधे  कुंभार काम करणारे जोडपे. ” फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विट्ठला तू वेडा कुंभार” म्हणत विट्ठलावर संसाराचा भर सोपवुन जगणारे. त्या विट्ठलाचीच कृपा समजुन दर वर्षी पाळणा रिकामा राहू न देणारे ( त्या काळचे प्रातिनिधिक) जोडपे.

विट्ठला तू वेडा कुंभार हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं आणि ते चित्रपटातलं गाणं आहे की संतांचा अभंग? असं वाटावं..

त्यातील आणखी एक सुप्रसिद्ध गाणं, त्यावेळी फारसं न उमजलेलं, पण आयुष्यात नंतर वेळोवेळी नवीन प्रकारे अनुभवाला येणारं, आणि  1961 सालापासून आज 2020 च्या

“कोरोना” काळापर्यंतच्या परिस्थितीला धरुन असणारं, आजही देवाचा धावा करून त्याच्याकडे मागणं करणारं गाणं म्हणजे ” पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी” किती साधे सोपे शब्द…पण  गदिमांच्या लेखणीच्या परिस स्पर्शाने ते अजरामर झाले आहेत.

“देवा, माजं लई मागणं न्हाई, पोळी नगं….भुकेपुरता पसाभर घास मिळू दे. शेतातल्या पिकाला गरज असेल तेव्हा आणि गरज असेल तितकाच पाऊस पडू दे. जेवढी चोच तेवढाच दाणा ही काळी आई देवो. एकवेळच्या भुकेला अन्न लागतं तरी किती?….तळहाताच्या खाळी एवढं, ओंजळभर! तेवढंच मिळू दे. माथ्यावरती छाया देणारं छप्पर आणि अंग झाकण्या पुरती वस्त्रे मिळावीत, इतकच देवा मागणं!

देवा, सोसवेल आणि पेलवेल तितकच सुख आणि दु:ख दे.

माझा कसलाच हट्ट नाही, कारण “तो देणारा हजारो हातानि  भरभरुन देईल….पण  माझी झोळी दुबळी.

सर्व सामान्य माणूस, मग तो आर्थिक दृष्टया कमी असो, मध्यम असो वा श्रीमंत असो, आयुष्य भर काम,क्रोध,लोभ,मद, मत्सर माया  ह्या षड्रिपूंच्या संगतीत असतोच. त्याच बरोबर व्यायसायिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, न पेलवणारी स्वप्ने, अपेक्षा या सर्वांवर तारेवरचि कसरत करत वयाच्या 55 वर्षाला पोचला की थोडासा अंतर्मुख होतो. न कळत त्याचा कल अध्यात्माकड़े झुकतो अणि सत्य समोर येतं,

“देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ”

असं जीवनाची bottomline असलेलं गाणं आता फारसं ऐकायला मिळत नाही. पण  आठवण येते तेव्हा मन शब्दां भोवती आणि त्याच्या अर्था भोवती रेंगाळतंच. हे रेंगाळणं खुप सुखकारी असतं.

अगदी साधे गुंफलेले शब्द,

“किमान” किंवा “कमीत कमी” या शब्दान्चं किती सुंदर रूप……!

केवळ एक वेळच्या भुके इतकाच घास मिळावा, कारण देणा-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी… मातीतून जन्म घेतलेले, आकाशाला जाऊन भिडणारे आणि परत मातीत येउन मिळणारे, आणि “अपुरेपण ही न लगे, न लगे पस्तावाची पाळी”  असे सत्यं शिवम सुंदरं ची प्रचीती देणारे शब्द.

मराठी माणसांच्या ह्रदयात,  जेथे पवित्र आणि सुंदरतेचा वास असतो तेथे, गदिमांचे स्थान अढळ आहे.

“ज्ञानियाचा वा तुकयाचा

तोच माझा वंश आहे

माझिया रक्तात थोडा

ईश्वराचा अंश आहे”

असे म्हणणारे गदिमांची लेखणी खरोखरच दैवी होती. शेकडो गाणी त्यांनी रसिकांना दिली. तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या गळ्यात, माजघरात, देवघरात, शेतमळ्यात, विद्वानांच्या सभेत, सर्वत्र त्यांच्या गाण्यांचा संचार आहे. कविता जन्म घेते आणि  शब्द उतरू लागताच  स्वर त्या शब्दांना मिठीत घेतात, तेव्हा त्या कवितांचे एक सुंदर गीत होतं, अशी अगणित गाणी आज 43 वर्षांनंतर सुद्धा चुकून ऐकायला मिळाली कि, nostalgic व्हायला होतं.

त्यातलंच हे एक अजरामर गाणं “देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”.

14 डिसेंबर हा दिवस गदिमा ह्या गीतरामायणकार महाकविच्या निर्वाणाचा.  त्यांच्या स्मृतीला अभिवादन. ??

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈