image_print

स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत ) 

Va Ra Kant Kavya Vishwa - Posts | Facebook

जन्म – 6 ऑक्टोबर 1913

मृत्यु – 8 सप्टेंबर 1991

☆ काव्यानंद ☆ वा.रा.कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर ☆

बगळ्यांची माळ फुले….

त्या तरुतळी विसरले गीत…

हे अजरामर गीत लिहिणारे नांदेडचे कवी वा. रा .कांत !

त्यांच्या काव्याचा आठव व त्यांचे स्मरण याहून अधिक काय हवे त्यांना? त्यांच्या काव्य रसनेने रसिकांची तृषा वाढते आणि शमतेही!

कवी आणि रसिक हे नातेच मोठे विलक्षण! कवी हा रसिकांमध्ये ‘ काव्यतृष्णा ‘ शोधतो आणि रसिक  कवींच्या काव्यात ‘काव्यरससुधा’ !

जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींकडे, अनुभवांकडे कवी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते ‘बघणे ‘ असे काही काव्यात मिसळतात की ते वाचल्यानंतर रसिकालाही ती दृष्टी मिळते  आणि तो ही  त्या अनुभवाचा तरल ,सूक्ष्म पदर अनुभवतो आणि भावविभोर होतो.

आता हेच पहा ना….. गावातील मातीचे घर… तुम्ही-आम्हीही बघितलेले. पण वारा कान्त लिहितात….

….. माझ्या मातीच्या घराची

भुई सुंदर फुलांची

दारावर अंधाराच्या

पडे थाप चांदण्यांची…..

 

किती सुंदर आहे ही कल्पना!

 

शरद ऋतूतील निळेभोर आभाळ, त्यात उडणारे शुभ्र पांढरे पक्षी….एक सुंदर निसर्ग दृश्य! कवींना मात्र काय वाटतं बघा….

 

शरदाच्या आभाळाचा

रंग किती निळा ओला

उड जपून विहंगा

डाग लागेल पंखाला !

 

अशा ओळी वाचल्या की वाटतं, या कवींच्या हृदयात काव्यरसाची एक कुपी कुणीतरी लपवून ठेवली आहे. त्यातले अत्तर त्यांच्या शब्दाशब्दात सांडत असावे!

अनुभवांच्या परिपक्वतेमुळे येणारी तृप्ती शब्दांमधून मांडताना कांत लिहितात…

 

….    असे बोलता हसता

गेले निघून दिवस

आता उरलीसे मागे

पिक्या फळांची मिठास !

 

अशा साध्या सरळ अनुभवांचे कवींच्या हाती सोने होते !

वा रा कांत यांचे ‘ बगळ्यांची माळ फुले’ हे काव्य म्हणजे एक चित्रच आहे. ती रम्य जागा, ते तरल ,मंतरलेले क्षण प्रत्येकाने आपल्या मनात जपून ठेवलेले आहेत.

 

…….. कमळापरी मिटती दिवस

उमलुनी तळ्यात…..

 

या सुंदर अनुभवात आपण रमलेलो  असताना कांत अचानक प्रश्न करतात….

 

……. सलते ती तडफड का

कधी तुझ्या उरात?…..

 

आणि मग हा प्रश्न कट्यारीसारखा आपल्या हृदयाच्या आरपार जातो!

अशा सुंदर सुंदर काव्य रचना करणाऱ्या वा रा कांत यांनी दोनुली, पहाट तारा, बगळ्यांची माळ, मावळते शब्द, रुद्रवीणा असे एकूण दहा काव्यसंग्रह लिहिले.

माझ्या मनात हे गीत नेमकं गातो कोण या प्रश्नाचा विचार करताना वा रा कांत लिहितात…

अभिमानाने कधी दाटता

रचिले मी हे गाणे म्हणता

‘गीतच रचते नित्य तुला रे’

फुटे  शब्द हृदयात

कळेना गाते कोण मनात…

आपल्या काव्य प्रतिभेचे श्रेयही ते स्वतःकडे घेत नाहीत. अशा या प्रतिभासंपन्न , विनम्र कवींना माझीही शब्दसुमने अर्पण!

 

© सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments