Best Bhojpuri Video Song - Residence w

?  काव्यानंद  ?

 ☆ नाच नाचुनी अति मी दमले – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – डॉ सौ सुषमा खानापूरकर ☆

नाच नाचुनी अति मी दमले

थकले रे नंदलाला

 

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला…

थकले रे नंदलाला….१

 

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला

लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवरी आला गेला…

थकले रे नंदलाला…२

 

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला….

थकले रे नंदलाला…..३

 

रचनाकार गदिमा

 

माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून त्याला सतत काहीतरी हवं असतं. जन्मल्याबरोबर श्वास घेण्यासाठी हवा पाहिजे असते. त्यासाठी तर तो रडतो.  या जगण्याची सुरुवातच तो काहीतरी हवंच आहे आणि त्यासाठी रडायचे अशी करतो. हे हवेपण (आसक्ती) आणि त्यासाठी रडणे आयुष्यभर सोबतीला घेतो. सुखाच्या शोधात दाहीदिशा वणवण भटकतो. सुखाची साधने गोळा करतो. पण नेमके सुख तेवढे हातातून निसटून जाते आणि दुःख अलगद पदरात पडते. सुखाशी लपंडाव खेळून खेळून शेवटी थकून जातो. पण पूर्वसुकृत म्हणा किंवा पूर्वपुण्याई म्हणा काही बाकी असेल तर जरा भानावर येतो. त्याला  समजतं की अरे सुखाचा शोध घेण्यात माझं काहीतरी चुकतंय!

जीवाच्या या भावभावनांची मानसिक आंदोलने गदिमांनी (कलियुगातील ऋषीमुनी) अगदी अचूक टिपली आहेत. लहानपणापासून तारुण्यापर्यंत दारिद्रय दुःख अवहेलना यांचे आतोनात चटके गदिमांनी सोसले.  अंतःकरण होरपळून निघाले पण म्हणतात ना, आंबट तुरट आवळ्याचा मधूर मोरावळा करायचा असेल तर त्याला उकळत्या पाण्यात टाकून नंतर टोचे मारुन मग कढत कढत पाकात घालतात. पण त्यामुळेच हा पाक अगदी आतपर्यंत झिरपतो आणि मग मधूर चवीचा औषधी गुणधर्म युक्त मोरावळा तयार होतो.

गदिमांच्या बाबतीतही अगदी हेच घडले. आणि मग भगवत् भक्तीच्या पाकात हे दुःखाने घरे पडली आहेत असे अंतःकरण घातल्याबरोबर त्यातून इतक्या सुंदर अक्षर अभंग रचना बाहेर पडल्या की त्या अगदी संतवाङमयाच्या पंक्तीत जाऊन बसल्या. जग हे बंदीशाला, विठ्ठला तू वेडा कुंभार, गीतरामायण अशी काव्ये लिहून त्यांनी स्वतःबरोबरच रसिकांना सुद्धा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

आयुष्यात सुखाचा शोध करुन करून थकलेला हा जीव! जीव हा प्रकृतीच्या आधीन म्हणजे प्रकृतीच. ती स्त्रीलिंगी,  आणि परमात्मा पुल्लिंगी! (ही भाषा सुद्धा मायेच्या प्रांतातीलच! बाकी जीवाशिवाला व्याकरणाशी काय देणे घेणे?) म्हणून हा जीव, ही प्रकृती त्या श्रीकृष्ण परमात्म्याला कळवळून सांगतेय की ..

नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटिस नेसले निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला

थकले रे नंदलाला

आयुष्यभर स्वतःची वासना तृप्त करण्यासाठी नको नको ती सगळी कर्मे केली. तेंव्हा जीवाला (प्रकृतीला) जराही लाज वाटली नाही. हे निलाजरेपण कमरेला वस्त्राप्रमाणे घट्ट बांधले होते. निसुगपणाचा निरुद्योगीपणाचा आळशीपणाचा शेलाही त्यावरुन गुंडाळून घेतला. कधीही कुठलेही सत्कृत्य, मानवतेची सेवा, ईश्वरसाधना करण्याचा आळस मी कधी  सोडला नाही. इतके दुर्गूण अंगी असूनही स्वतःच स्वतःची स्तुती करणे, मोठेपणा मिरवणे आणि इतरांकडूनही स्वतःची वाहवा ऐकणे यातच धन्यता मानली. या आत्मस्तुतीने माझा अहंकार सुखावला, मला गर्व झाला, घमेंड आली. पाखंड माजले. तेच या भाळावर कुंकवाचा टिळा लावावा तसे लावून मिरविले.  त्या मस्तीतच सगळ्या भौतिक गोष्टींच्या उपभोगात रममाण झाले, सुखावून गेले. खूप नाच नाच नाचले. अखेरीस थकून गेले. या मायिक भौतिक सुखांना आतून दुःखाचे अस्तर, दुःखाची झालर लावलेली आहे याचे भान मला फार उशिरा आले.

नंदलाला,  मी थकले रे

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला

लोभ-प्रलोभन नाणी फेकी, मजवरी आला गेला

विषयवासनेची वीणा कानाशी वाजत होती. मनातील वासना तृप्त होण्याचे नाव घेत नव्हती. या अतृप्तीच्या तालावर या वासनेच्या वीणेची तुणतण ऐकत मी बेभानपणे नाचत राहिले. अन्यायी वर्तणूक

अनीतीचे आचरण  यांचे जणू पायांत  नूपूर बांधले होते. कुमार्गावर पावले नाचत नाचत वेगाने चालली होती. माझ्यासारख्याच दुर्वर्तनी मंडळींची कुसंगती हातांवर टाळ्या देत होती. माझ्याकडून काही हवे असेल तर माझी स्तुती गाऊन ही मंडळी ते ओरबाडून घेतच होती. माझ्यावर लोभ-प्रलोभनांचा वर्षाव करुन मला त्यातून बाहेर पडूच देत नव्हती. विषयोपभोग, खोटी स्तुती, घमेंड, ढोंग/पाखंड या साऱ्या मोहनिद्रेत मी स्वतःलाच विसरून गेले.

नंदलाला, मी थकले रे

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

नाचता नाचता स्वतःभोवती गिरक्या घेत होते. ह्या गिरक्यांनी मला भोवळ आली. डोळ्यांपुढे अंधारी आली. आपलं काय परकं काय काहीच दिसेना, काहीच कळेना. या बेताल वागण्याने, नाचण्याने माझा तोल जाऊ लागला. जगण्याचा ताल चुकला, लय चुकली. जीवनसंगीत बेसूर बेताल झाले. माझे कान बधीर झाले. इतके की मला माझ्याच अंतर्मनाची साद, हाकही ऐकू  येईना. तो साद गोठून गेला.

भगवंता, आता समजतंय की सुख देण्याची या विषयोपभोगांची क्षमता फार कमी आहे आणि उपभोग घेऊन त्यातून सुख घेण्याची माझ्या इंद्रियांची क्षमता, ताकद सुद्धा फार तोकडी, फार फार अपुरी आहे . खरे सुख कुठेतरी हरवून, हरपून गेले आहे. शोध घेता घेता मी फार थकून गेले,. या अज्ञानाच्या अंधःकारात  डोळे असूनही मोहाची पट्टी डोळ्यांवर बांधल्यामुळे आंधळ्याप्रमाणे चांचपडू लागले, ठेचकाळू लागले. जीव आता जगण्याला भ्यायला. जगण्याचीच भीती वाटू लागली. जीवातील चैतन्य हे सत् म्हणजे निरंतर अस्तित्वात असणारे चैतन्य

आहे, तेच साक्षात सुखस्वरूप आहे याचा विसर पडला आणि थकून गेले रे!

नंदलाला मी थकले रे

© डॉ सौ सुषमा खानापूरकर

भुसावळ

मो 8600939968

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments