श्री विकास मधुसूदन भावे
परिचय
श्री विकास मधुसूदन भावे कला शाखेचा पदवीधर असून रिलायन्स एनर्जी लिमिटेड या कंपनीत ३४ वर्षे नोकरी करून २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. ‘ स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा….’ यासारखे तरल भावकाव्य लिहिणारे विख्यात कविवर्य कै. म. पां. भावे या त्यांच्या वडिलांकडून त्यांना कवितेचा वारसा मिळाला आहे.
‘त्रिमिती‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
चित्रकविता ही त्यांची खासियत आहे.
महाराष्ट्र टाईम्स मधील वाचनीय सदरात त्यांची पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. अनेक नियतकालिके, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, लेख, कविता प्रकाशित झाल्या आहेत.
वडील कविवर्य कै. म.पां.भावे यांच्या ‘अरे संसार संसार ‘ या विडंबन गीतांच्या कार्यक्रमात व अन्य गाण्यांच्या कार्यक्रमात निवेदक म्हणून त्यांचा सहभाग.
रेडिओ विश्वासवर ‘मला आवडलेले पुस्तक‘ या कार्यक्रमात त्यांनी दोन वेळा पुस्तक परीक्षण सादरीकरण केले आहे.
अक्षरमंच कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा क्रमांक ४ मध्ये ‘ कलावंत’ या विषयात सर्वोत्कृष्ट काव्यलेखनात त्यांच्या कवितेला दुसरा क्रमांक, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,कल्याण तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखनात ३ रा क्रमांक , फेब्रुवारी २०२० मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘ चांदणे संमेलनात ‘ विडंबन स्पर्धेत दुसरा क्रमांक, ‘ रोज एक कविता ‘ या फेसबुक पेजतर्फे घेण्यात आलेल्या ‘ चित्रावरुन कविता ‘ या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक अशाप्रकारे बक्षिसे व पारितोषिकांनी ते गौरवांकित आहेत.
☆ काव्यानंद ☆ कौसल्येचा राम…. महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे ☆
स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
रसग्रहण: कौसल्येचा राम….
“कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम”.—- कवी, गायक,आणि संगीतकार या तिघांच्याही कौशल्यामुळे हे गाणं केंव्हाही ऐकलं तरी आपल्या हृदयावर राज्य करतं, आणि थोडाफार काळ का होईना, भक्तीचा मळा आपल्या चंचल मनामधे फुलत रहातो. या गाण्याचे शब्द आहेत शब्दप्रभू गदिमा यांचे. भक्ती अशी असावी, दृढ विश्वास असा असावा की परमेश्वर तुमच्या मदतीला धावून यायलाच हवा, हे गदिमा एका ओळीतच सांगतात—
“भाबड्या या भक्तासाठी देव करी काम”
भक्त हा ‘ भाबडा ‘ असावा. परमेश्वरावर अढळ विश्वास आणि निस्सीम भक्ती …. जी कोणत्याही प्रसंगात जराही डळमळीत होत नाही. भाबडा म्हणजे असा माणूस जो आपली सर्व कामं करताना “ईश्वरेच्छा बलियेसी” असा विचार करून प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान आहे अशी मनाची पक्की बैठक तयार करतो.
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
कबीराची श्रीरामांच्या प्रती असलेली भक्ती एवढी श्रेष्ठ दर्जाची आहे की एकतारी घेऊन प्रभू रामचंद्रांची स्तुतीभजनं म्हणताना तो देहभान विसरून जात असे. प्रल्हादानं लहान वयात केलेल्या भगवंतभक्तीचं फळ म्हणून विष्णूने नृसिंहरूप धारण करून प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्याचा भक्तीमार्ग निष्कंटक केला. तर नामदेवाच्या हट्टापुढे प्रत्यक्ष पांडुरंगाला सगुण रूपात येऊन प्रसाद भक्षण करावा लागला. प्रभू रामचंद्रांनी कबीराची त्यांच्याप्रती असलेली निर्मळ भक्ती पाहून एकतारीच्या पार्श्वभूमीवर एकेक धागा विणत कबीराचं काम करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. तुमचा भक्तीभाव आणि भक्तीमार्ग जर खरा असेल तर देवही तुमचं काम करतोच करतो हा विश्वास या घटनेमधून सामान्य माणसाला मिळतो.
दास रामनामी रंगे राम होई दास
एक एक धागा गुंते रूप ये पटास
नामाचा महिमा हा फार मोठाअसतो हे सर्व संतांनी सांगून ठेवलं आहे. राघवाचा निस्सिम भक्त कबीरही आपल्या एकतारीची सुंदर साथ घेत रामनाम घेण्यामधे अगदी रंगून गेला आहे. भक्तांची काळजी देवाला असते असं म्हणतात आणि म्हणूनच कबीराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी पुढाकार घेतला आहे. श्रीरामांच्या पवित्र हातातून धाग्याला धागा जोडला जातोय आणि हळूहळू कबीराचा शेला आकार घेतो आहे. पण कबीराला मात्र या गोष्टीचं भान नाहीये. “दास रामनामी रंगे राम होई दास” या शब्दांमधून गदिमांची काव्यप्रतिभा आणि शब्दयोजना या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो.
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
लुप्त होई राम कौसल्येचा राम
खरी भक्ती आणि खोटी भक्ती यातला फरक माणसाला जरी समजला नाही तरी परमेश्वराला तो निश्चितच कळतो. त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करायची की नाही हे ठरवत असतो. कबीराची श्रीरामांवर असलेली श्रद्धा आणि भक्ती सर्वज्ञात तर होतीच, पण प्रभू रामचंद्रांनाही त्याच्या भक्तीविषयी खात्री पटली म्हणूनच कबीराची आणखी कोणतीही परीक्षा न घेता स्वहस्ते मदत करून शेला विणून पूर्ण केला. अर्थात प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते विणलेल्या त्या शेल्यावर जागोजागी रामनामाची मोहोर उमटली होती. संपूर्ण शेला विणून कबीराचं काम पूर्ण केल्यानंतर मात्र प्रभू श्रीराम तिथून अदृश्य झाले.
हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणुनीया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कौसल्येचा राम
श्रीरामांच्या भजनामधे तल्लीन होऊन गेलेला कबीर काही काळानंतर भानावर आला. विणून पूर्ण झालेल्या संपूर्ण शेल्यावर जेंव्हा त्याने “श्रीराम” “श्रीराम” अशी अक्षरं पाहिली, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं कि आजूबाजूचं जग विसरून ज्या दैवताच्या भजनपूजनात तो रंगून गेला होता, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्या हातांनी कबीराचा शेला विणून, एकप्रकारे त्याचीच सेवा केली होती.
माणिक वर्मा यांच्या आवाजातील “देव पावला” चित्रपटातील या गाण्याला संगीत दिलं आहे महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांनी. गदिमांनी लिहिलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना मनाला ख-या भक्तीची साक्ष पटत जाते.
© श्री विकास मधुसूदन भावे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
वा, विकास भावे सर, ठाणेकरांचा अभिमान !