श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ रिकामे मधुघट… भा. रा. तांबे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

काव्यानंद.  : रिकामे मधुघट अर्थात मधु मागसी माझ्या…

काही कवींच्या रचना या इतक्या अर्थपूर्ण असतात की स्वर आणि संगीताच्या दुनियेत रमणा-या कलावंतालाही त्या आकृष्ट करून घेतात.शब्दांना स्वर आणि संगीताचा साज चढला की त्या काव्याचे एका सुमधूर भावगीतात रूपांतर होते आणि मग ते काव्य रसिकांच्या ओठावर विराजमान होते. अशा कवींपैकी एक कवी म्हणजे राजकवी  भा. रा. तांबे. तांबे यांच्या रचनांना शंभर वर्षे होऊन गेली पण त्या काव्याचे गीत कधी झाले समजलेही नाही. सुस्वर आणि संगीत लाभूनही गीतातील मूळ शब्द कुठेही हरवलेले नाहीत. हेच कवीच्या शब्दांच सामर्थ्य आहे! कवीवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता भावगीते बनून आपल्या समोर आल्या आहेत. त्यातील एक कविता म्हणजे ‘मधुमागशी माझ्या सख्या परी  …’

कोण हा सखा? त्याला कोण म्हणत आहे हे? कवीच्या अखेरच्या काळात लिहीली गेलेली ही रचना आहे. एखादी सुंदर कविता कवीकडून व्हावी आणि ती आपल्याला वाचायला मिळावी  अशी रसिकाची अपेक्षा आहे. त्यावेळेस कवी त्याला आपल्या शब्दात उत्तर देत आहे .

हा सखा म्हणजे रसिक वाचक. आपल्या प्रिय कविच्या एकाहून एक मधुर रचना वाचून त्याची सवय झालेला हा रसिक वाचक. त्याला काव्याच्या घटातील मधुर रस हवाहवासा वाटतो आहे आणि तो कविला मागतोही आहे. पण कवी मात्र आता त्या मनस्थितीत नाहीय. कमळांच्या द्रोणातून मध पाजावा त्याप्रमाणे  कविने आजपर्यंत अनेक  उत्तमोत्तम   रचना रसिकांच्या सेवेला सादर केल्या. पण आता नाही.कारण आता पैलतीर दिसू लागला आहे. आयुष्याची संध्याकाळ दिसू लागली आहे. बघता बघता संध्या छाया गडद होऊन जातील आणि दिवस ….आयुष्याचा दिवस…. केव्हा संपला समजणारही नाही. आता तू मागावस आणि मी द्याव इतकी ताकद माझ्यात उरली नाही. बागेतील टपोरी, सुगंधी फुलं संपावीत आणि काटेरी कोरांटीच तेवढी उरावी अशी माझी अवस्था झाली आहे. संसाराच मर्म सांगणारी, यौवनाने रसरसलेली, निसर्ग संगीताने नटलेली अशी कविता तुला हवी आहे. पण आता ते शक्य नाही. मनात तशा उर्मी नाहीत आणि हातात तितकी ताकद नाही. तेव्हा आतापर्यंत केलेली काव्यसेवा आठव आणि माझा काव्यमधुघट रिकामा पडला आहे हे समजून घे.

एकिकडे रसिकांची अपेक्षा तर दुसरीकडे कवी ची असमर्थता. पण ती असमर्थता व्यक्त करतानाही कविने किती सुंदर शब्दांची योजना केली आहे हे पाहण्याजोगे आहे.नकार देताना त्रागा नाहीच, उलट रसिकालाच रागावू नको, रोष करू नको अशी विनंती कवी करत आहे. कारण आपली प्रत्येक रचना ही रसिकासाठीच आहे याची जाणीव कवीला आहे. म्हणून तो एकीकडे बळ न करि अशी विनवणी करतो आहे तर दुसरीकडे करि बळ नाही हे मान्यही करतो आहे. एकाच शब्दपंक्तितून दोन अर्थ व्यक्त करण्याची ताकद त्याच्या लेखणीत अजूनही आहे. पण तो मात्र होणा-या अस्ताच्या चाहुलीने मनातून भयभीत झाला आहे.

भा.रा.तांबे यांच्या एकाहून एक सुंदर अशा कवितांपैकी ही एक कविता. काव्यरसाच्या घटातून त्यांनी एक एक काव्याचा पेला रसिकांना अर्पण केला. पण शेवटी शेवटी मात्र त्यांच्या मनात असाहयतेची भावना जागृत झालेली दिसते. पण खरे पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा मधुघट रिकामा  झाला आहे असे वाटत नाही. कारण या काव्याची रचनाही इतकी सुंदर, अर्थपूर्ण, गेय आहे की त्यांच्या इतर कवितांप्रमाणेच त्याचे गीत झाले आणि रसिकांना एक वेगळा आनंद उपभोगता आला. कारण हा काव्यभास्करच आहे. मराठी काव्यक्षितिजावरून  तो कसा मावळेल? खरे ना ?

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments