श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ प्रिय विणकरा….शांताबाई शेळके ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

प्रिय विणकरा

मलाही तुझे कौशल्य शिकव

प्रिय विणकरा..

नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना

जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो तेव्हा

दुसरा त्यामध्ये गुंफून

तू पुढे विणू लागतोस

तुझ्या या वस्त्रात पण

एकही गाठ

 कुणाला दिसत नाही

मी तर फक्त एकदाच

विणून पाहिलं होतं

एका नात्याचं वस्त्र

पण त्याच्या साऱ्या गाठी

स्पष्ट दिसताहेत

प्रिय विणकरा

 – शांता शेळके

कवी गुलजार यांच्या,’ यार जुलाहे ‘ या हिंदी कवितेचा अनुवाद !

एखाद्या विणकराच्या घराशेजारी कवीचे वास्तव्य असावे.तो रोज विणकराचे विणकाम बघत असावा. हळूहळू कविच्या मनात विणकराच्या कामाबद्दल इतका आदर निर्माण झाला असावा की त्याचे कौतुक वाटता वाटता तो कवीचा प्रिय मित्र बनला असावा.एक दिवस तो विणकराला म्हणला असणार,

‘ हे प्रिय विणकरा मी तुला नेहमी वस्त्र विणताना बघतो.किती सुंदर वस्त्र विणतोस..वस्त्र विणताना एखादा धागा जर तुटला किंवा संपला तर त्यात तू  दुसरा धागा इतका सहजपणे गुंफतोस की असा जोडलेला धागा न ओळखण्याइतका सफाईदार असतो की धागा जोडलेल्या ठिकाणी बारीकशी ही गाठ दिसत नाही इतके दोन्ही जोड एकरूप झालेले असतात.

 माणसाच्या नात्याचेही असेच आहे.दोन नाती अशी जोडली गेली पाहिजेत की दोन्ही एकच,एकरुप झाली पाहिजेत तरच आयुष्याचे तलम वस्त्र तयार होईल.’

प्रिय विणकरा असा विचार करून  मी एकदाच एक नात्यांचे वस्त्र विणायला घेतले नाती जोडायला गेलो पण विचार एकरूप न झाल्याने त्या वस्त्रावर अविचार, गैरसमज, मतभेदांच्या गाठी दिसू लागल्या.प्रिय विणकरा त्यामुळे दुसरे वस्त्र विणावेसे वाटलेच नाही.

या कवितेत कविला अभिप्रेत असलेला विणकर म्हणजे सुविचारी,एकमेकांच्या विचारांचा सांधा जो आपल्या कौशल्याने दुसऱ्याचे दोष सुविचारात परिवर्तित करतो.आयुष्याचे तलम वस्त्र विणण्यात यशस्वी होतो.आणि कवी हा त्यातला दुसरा घटक ज्याला हे कौशल्य प्राप्त करता आले नाही त्यामुळे तो नाती जोडू शकला नाही, टिकवू न शकणारा असा अप्रिय विणकर ठरला.

कवी गुलजार यानी अगदी सहजपणे नात्यांची जोडणी कशी होते,तोडणी कां होते हे मार्मिकपणे सांगितले असून आदरणीय कवियत्री शांता शेळके यानी अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे

 तेव्हा आपण नात्याची तोडणी न करता जोडणी करू या .आताच्या विस्कळीत समाजमनाला त्याची नितांत गरज आहे.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments