सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆
निर्गुणाचे डहाळी।
पाळणा लाविला।
तेथे सुत पहुडला।
मुक्ताईचा॥
निज निज बाळा।
न करी पै आळी।
अनुहात टाळी।
वाजविते॥
तेथे निद्रा ना जागृती।
भोगी पै उन्मनी।
लक्ष तो भेदूनी।
निजवतो॥
निभ्रांत पाळी।
पाळणा विणुनि।
मन हे बांधुनि।
पवन दोरा॥
एकवीस सहस्र।
सहाशे वेळा बाळा।
तोही डोळा।
स्थिर करी॥
बालक चुकले।
सुकुमार तान्हुले।
त्याने पै सांडले।
मायाजाळ॥
जो जो जो जो।
पुत्राते निजवी।
अनुहाते वाव।
निःशब्दांची॥
अविनाश पाळणा।
अव्यक्तेने विणला।
तेथे पहुडला।
योगिराज॥
निद्रा ना जागृती।
निजसी काई।
परियेसी चांगया।
बोले मुक्ताबाई॥
– संत मुक्ताबाई
☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
रसग्रहण/अर्थ
चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला.
मुक्ताबाई म्हणतात,
निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत. ॐ कार नाद हा अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद तू मनाच्या उन्मनी अवस्थेतच ऐकू शकशील. सामान्यपणे मनाच्या चार अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा व तुर्या म्हणजे आत्मशोध किंवा स्वतःची स्वतःला ओळख पटणे, ब्रम्ह व माया दोन्हींचे पूर्ण ज्ञान होणे. पण या अवस्थेत द्वैत असते. यापुढची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत मन तदाकार होते. विश्वातील दिव्यत्व व आत्म्यातील दिव्यत्व यांच्या एकरूपतेची जाणीव होते. अद्वैताचा अनुभव येतो. म्हणून मुक्ताबाई आपल्या शिष्याला सांगत आहेत की तू या उन्मनी अवस्थेचा अनुभव घे. निभ्रांतीच्या म्हणजे निर्मोहाच्या दोरीने तुझा पाळणा विणला आहे. त्याला झोका देण्यासाठी मनाची दोरी बांधली आहे. म्हणजे तुझं मन या निर्मोही अवस्थेचा आनंद घेऊ दे.
सामान्यपणे आपण १०८०० वेळा दिवसा व १०८०० वेळा रात्री श्वास घेतो. मुक्ताबाई सांगतात, सामान्य माणसांप्रमाणे तू एकवीस सहस्र सहाशे वेळा श्वास न घेता, तू तो स्थिर कर म्हणजेच त्यावर ताबा मिळवून त्याची गती कमी कर. (ही गती १०८ पर्यंत खाली आणली तर परमेश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.)
माझं बाळ लहान आहे ते वाट चुकलं होतं.(चांगदेव हे सर्व शास्त्रात पारंगत होते. त्यांना योगीराज म्हटलं जायचं. परंतु त्यांचे ज्ञान सत्संग विरहित होते कारण त्यांना अहंकाराची बाधा झाली होती.) पण आता त्याने माया मोह यांचा त्याग केला आहे. म्हणून अशा आपल्या पुत्राला मुक्ताबाई निःशब्दपणे अनाहत नाद ऐकवून झोपवत आहेत.
हा योगीराज चांगदेव बाळ, गुरूंनी विणलेल्या ज्ञानाच्या अविनाशी पाळण्यामध्ये पहुडला आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या गुरूंनी सांगितलेल्या योगमार्गातील उपदेशपर गोष्टी ऐकत आहे.
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
मो. 9850228658
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈