🌸 विविधा 🌸

☆  संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆ 

संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! 🙏🏻 

असा कसा देवाचा देव बाई ठकडा       

देव एका पायाने लंगडा!                         शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो           

करी दह्या दुधाचा रबडा!                        वाळवंटी जातो किर्तन करितो               

घेतो साधुसंतांसी झगडा!                        एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई             

देव एकनाथाचा बछडा!!

*****

मराठी भाषेचे पहिले संपादक संत म्हणजे…संत एकनाथ! भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत ; त्यांपैकी एक…भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ! मानवी जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करून देणारे…एक उत्तम साधक, कथा-कथक, ज्ञान प्रसारक!एक उत्कृष्ट कीर्तनकार!!त्यांनी अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनवली. साधी सोपी सर्वांना समजेल अशी, निरूपणातील भाषेपेक्षा , प्रबोधन करणारी, सामान्यांना कळेल अशी भाषा वापरून  गौळण हा काव्यप्रकार समाज मनात रूढ केला रूजवला. सुंदर अशा काव्य वैभवाने नटलेला हा काव्यप्रकार श्रोत्यांची गानसमाधी लावणारा, भक्ती चे अमृतपान करविणारा ठरला. श्रोते तन्मयतेने डोलू लागले. अशाच एका प्रसिद्ध गौळणीचा आनंद लुटू यात…  शब्द वैभव, शब्द योजनेतली चतुराई, नादमाधुर्य आणि कानांत रुंजी घालत रहाणारे शब्द… या सगळ्याच शब्द गुंफणीचा अनोखा अनुभव देणारी ही गौळण!!                     

एकनाथांनी लोकांना समजेल अशी साधी सोपी सुलभ भाषाशैली वापरत    लोकव्यवहारातील शब्द वापरलेली ही गौळण….देवाबरोबर सलगी साधत, लटक्या तक्रारीच्या सुरात एकनाथ सांगताहेत… 

” आश्चर्य च नाही कां हे??? अहो, हा रांगणारा बाळकृष्ण लंगडा म्हणवला जात असला तरी मोठा  ठकडा आहे. लब्बाड आहे.भुरळ घालून कधी डोळ्यात धूळ घालून… फसवून गोपींच्या घरी जाऊन… शिंकं तोडून, मडकं फोडून,दही-दूध सांडून त्याचा रबडा करतो..पत्ताच लागत नाही.  एकनाथांनी कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन करतांना लोकव्यवहारातील  ठकडा हा शब्द प्रयोग करत..यमक चा प्रभाव साधत… काव्यात गेयता तर आणलीच आहे… पण जोडीला जो एक ठसका जाणवतोयं ना त्यात त्यामुळे साधलेली परिणाम कारकता  आणि मना-मनांची घेतलेली पकड.. .शब्दातीत!!  मधुरा भक्ती चा अननूभूत असा अविष्कार आहे ही गौळण! ही भक्ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून च एकनाथांनी लोकभाषा आणि बोली भाषेतील शब्द प्रयोग केला आहे.                

संस्कृत भाषेतील ज्ञानामृत सर्वसामान्यांना मिळावे यासाठी एकनाथ विद्वत्जनांचा विरोध सहन करत…वाळवंटी जाऊन किर्तन करीत. एकनाथ आपल्या कवनांत आपल्या गुरूदेवांचा  नेहमीच उल्लेख करत… एका जनार्दनी!!!!🙏🏻 ही त्यांची नाममुद्रा च आहे! या गौळणीत शेवटी एकनाथांनी त्यांच्या लाडक्या देवाशी… त्याला बछडा असं संबोधत… फक्त साहचर्य च नाही तर एकरूपत्व. …तद् रूपत्व लाभावे अशी भिक्षा मागत कृपादृष्टी चं दान पदरात द्यावं अशी याचना ही केलीयं! प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ घालत  लोकभाषेतील शब्द बद्ध असा हा गीत प्रकार समाजात त्यातल्या सहजता आणि सुलभता, गेयता या रचनावैशिष्ठ्यांमुळे जास्त रूजला, बहरला, कीर्तन-भजनात म्हंटला जाऊ लागला. वरील गौळण आजही मोठ्या ठसक्यात आणि तिच्या शब्दालंकार युक्त लावण्या चा आस्वाद देत श्रोत्यांच्या मनात ठसते हे वेगळं सांगायला नको ना??                

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments