सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

‘आई’ हे आपले परमदैवत. आई म्हटले की आठवतो तो तिचा प्रेमळ उबदार स्पर्श, तिने भरविलेला मऊ दुधभात आणि तिने अंगाई म्हणत आपल्याला निजवणे. तिच्या प्रेमळ आवाजाने आपल्याला छान झोप येई. देव देवतांच्या जन्मोत्सवाचे वेळी जे पाळणे म्हटले जातात त्याच पारंपारिक चालीवरती डॉ. निशिकांत श्रोत्री सरांनी ही ‘अंगाई’ लिहिलेली आहे.

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई 

निज निज निज बाळा ||ध्रु||

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडुदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलाशी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

चांदोबा आला

घेउनिया तारका  नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायाला 

डोळा पेंगुळला

मिटुनीया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले 

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुज देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

हे कुलभूषणा

नाव करी दिगंत दाही दिशांना

तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

 – डॉ. निशिकान्त श्रोत्री

अंगाई…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे 

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई

निज निज निज बाळा ||ध्रु||

अरे सोनुल्या, माझ्या बाळा, आता गाई गाई कर. शांत झोपी जा. तुझ्यासाठी मी पाळणा झुलवीते आहे. मी तुझी आई तुला अंगाई गाते आहे. आता गाई गाई कर. अगदी मृदू आवाजात आई आपल्या तान्हुल्याला हे म्हणते आहे. या शब्दांमध्ये निज निज, आई, गाई, अंगाई या शब्दांमध्ये छान अनुप्रास साधल्याने या अंगाईला छान लय प्राप्त झाली आहे.

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडूदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलासी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

अरे छकुल्या, चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे तुझे सवंगडी आहेत. त्यांच्याबरोबर तुझे खेळ किती रंगतात. तुझे हे खेळगडी पण तुझ्यावर किती माया करतात. त्यांच्याशी खेळताना तू घरभर कसा दुडूदुडू रांगत असतोस. खेळून खेळून तू आता दमला आहेस. तेव्हा आता तुझ्या पापण्या मिटू देत. आता छान गाई गाई कर.

बाळाचे जेवण तर चिऊ-काऊ शिवाय होतच नाही. आजूबाजूला पळणाऱ्या माऊ, भू भू बरोबर बाळ पण भरभर रांगत असते. अगदी बालवयापासून या प्राणी मित्रांशी त्याचे मैत्र जुळत जाते. इथे वापरलेल्या ‘दुडूदुडू’ शब्दाने रांगणारे बाळ आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे शब्द बालकांच्या बोलीभाषेत आहेत.बाळाच्या बोबड्या बोलीत ते शब्द आणखीनच मोहक वाटतात. या शब्दात साधलेला अनुप्रास शब्दांची रंगत आणखीन वाढवतो.

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

अरे माझ्या सोन्या, त्या निरांजनातल्या वाती सुद्धा आता शांत होत विझल्या आहेत. अरे आता तुला झोपवायला मिट्ट काळोख आलेला आहे बघ. तरी सुद्धा न झोपता का एवढी झोपेची वाट बघतोस ? आता शहाण्यासारखा झोपी जा.

इथे काजोळा, धांडोळा या थोड्या अपरिचित शब्दांनी छान स्वरयमक जुळले आहे.इथेही लडिवाळा, बाळा, सगळा, धांडोळा, काजोळा यामधे सुंदर अनुप्रास साधलेला आहे.

चांदोबा आला

घेउनिया तारका नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायला

डोळा पेंगुळला

मिटुनिया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

अरे बघ, तो आकाशीचा चांदोबा तारका आणि चांदण्या घेऊन आला आहे. त्याचे हे चांदणे तुला निजवायला अंगाई गाते आहे. तुझे डोळे सुद्धा पेंगुळले आहेत. बाळा आता पापण्यांचे पंख मिटू देत. आता गाई गाई कर.

इथे गोष्टीतून, गाण्यातून ओळख झालेला चांदोमामा आणि त्याच्या चांदण्या बाळाच्या भेटीला येतात.इथेही छान अनुप्रास साधलेला आहे.

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

अरे सोनुल्या, गाईची वासरं सुद्धा शहाण्या बाळासारखी तिच्या शेजारी झोपली आहेत. या कपिलेने त्यांना दूध पाजवून झोपविले आहे. त्यांच्यासाठी झोपाळा पण नाही. तरी सुद्धा बघ त्यांना कशी शांत झोप लागली आहे. मी तर तुला झोका देते आहे. तू पण आता शांत झोप.

आता इथे बाळाची समज वाढल्याने हम्मा आणि तिचे बाळ वासरू त्याचे दोस्त झालेले आहेत.

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

अरे तुझी मैत्रीण ती परी राणी आहे ना ती तुझ्यासाठी जादूची दुलई घेऊन आली. तू झोपावंस म्हणून ती पण तुला झोका देते आहे. तेव्हा आता पायाचा चाळा थांबव. वाळा वाजवू नकोस. आता पटकन डोळे मिटून घे आणि शांत झोपी जा.

आता  इथे गोष्टीतली परी राणी बाळाला भेटायला येते. त्याला झोका देऊन झुलवीते  सुध्दा. झोकाळा, वाळा, डोळा, बाळा यात छान अनुप्रास साधला आहे त्यामुळे कवितेची लय आणखीन वाढली आहे.

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुझ देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

रात्रीच्या शांत वेळी शांत असणाऱ्या झाडाखाली पडलेला पाचोळा सुद्धा शांतपणे निजला आहे. सगळीकडे सैरावैरा घोंगावत धावल्यामुळे वारा सुद्धा खूप थकून आता शांत झाला आहे. मग तूच अजून का जागा आहेस ? मी तुला झोका देत जोजवते आहे. आता शांत झोप.

बाळ आता आजुबाजूच्या निसर्गात रमायला लागते. त्यामुळे झाडे, वारा त्याला समजायला लागतात हे इथे लक्षात येते.

 हे कुलभूषणा

 नाव करी दिगंत दाही दिशांना

 तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

अरे सोनुल्या, तू आमच्या कुळाचे भूषण आहेस‌. तुझ्या गुणांनी, कर्तृत्वाने दाही दिशांत तुझे नाव होऊ दे. तुझे रुप हे खूप देखणे आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. कारण तू आमचा जीव की प्राण आहेस. बाळा तू जणू श्रीराम श्रीकृष्णाचे गोजिरे बाळरूपडे आहेस. आता शांतपणे झोपी जा.

इथे गोष्टीतले राम-कृष्ण बाळाच्या भेटीला येतात. बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याचे विश्व विस्तारत जाते. त्याच्या बालविश्वात हळूहळू परिसरातले सगळे प्राणी, पक्षी, गोष्टीतली पात्रे, आजुबाजूची माणसे बदलत जातात. अंगाईच्या प्रत्येक कडव्यात त्याचा छान उल्लेख आला आहे.

या अंगाई गीतात बाळाला झोपवताना आईच्या मनातील कोमल भावना अचूक शब्दात उत्कटपणे व्यक्त झाल्या आहेत. या भावपूर्ण रचनेतील कवीचे शब्दसामर्थ्य प्रभावी आहे.

कवितेत बहुतेक  सर्व कडव्यात छान अनुप्रास साधलेला आहे. त्यामुळे कवितेची विशिष्ट लय वाढलेली आहे आणि कवितेला नैसर्गिक स्वरूमाधुर्य प्राप्त झालेले आहे. यामुळेच बाळाला आपोआप गुंगी येऊन झोप लागते.

चांदोबा तारका घेऊन आला, चांदणे अंगाई गाते, परी राणी झोका देते, पाचोळा निजला, वारा थकला या वाक्यरचनेत चेतनागुणोक्ती अलंकाराचा छान उपयोग केलेला आहे. त्यामुळे ही सर्व पात्रे गीतामध्ये जिवंत होऊन सामोरी येतात आणि या गीताची रंगत आणखीनच वाढते.

झोपताना शांत झालेले बाळ जास्त संवेदनशील झालेले असते, तशीच बाळाला झोपवणारी आई जास्तच भावनाप्रधान झालेली असते. तिच्या सर्व कोमल भावना उचंबळून येतात. अंगाईतून ती बाळाला आजूबाजूचा निसर्ग, प्राणी, पक्षी यांची माहिती, अगदी स्वतःची ओळख पण सांगते. बाळाच्या मनात ते सर्व कुठेतरी नोंदले जाते. बाळ यातून आईचा आवाज, स्पर्श ओळखायला शिकते. सर्व गोष्टी ओळखायला लागते. शेवटी त्याला देवाच्या बाळरूपात बघणारी आई आपल्या तान्हुल्याचे मोठे झाल्यावरचे, त्याच्या यशाचे, कर्तृत्वाचे स्वप्न बघायला लागते.

या सर्व तरल भावना या कवितेत उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेल्या आहेत. हळव्या मातृ हृदयाचे भावपूर्ण हुंकार अतिशय उत्कटपणे मांडणारी ही डॉ.श्रोत्री यांची भावमधुर अशी अंगाई आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments