सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆
पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें
दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें
नाशासि पारसिक तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें
ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें
हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं
हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?
कवी – वि दा सावरकर
रसग्रहण
ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!
प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.
आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.
या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈