सौ. अमृता देशपांडे
☆ काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
रसग्रहण:
कोवळ्या हिरव्यागार गवताच्या फुलांवर ठिबकलेले दवबिंदू, समोर दाटलेला धुक्याचा तलम झिरमिरित पडदा, ताजातवाना, थंड सुखद गारवा. शरद ऋतुतल्या अशा पहाटवेळी श्री वसंत बापट यांनी कवीमनाला मुक्त केले आहे.
” अशी ही शरद ऋतुतील तरणीताठी पहाट समोर आहे, जणु उषेनं हिरवागार चुडा दोन्ही हातात भरलाय, तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. गवतपातीच्या नाजुक तनुवर दवाचं चमकणारं कणीस खुलून दिसतंय.
जणूकाही अष्टदिशा तिच्या दासी होऊन तिला न्हाऊ घालत आहेत. आणि अशा राजविलासी थाटात नुक्ते स्नान करून आलेली पहाट आपली आरसपानी कांती न्याहाळत आहे. तितक्यात कुणाच्या तरी चाहुलीनं ती थबकली. चटकन आपल्या विवस्त्र देहलतेवर हात उंचावून रवि-रश्मी चं सोनेरी वस्त्र ओढून घेतलं. अंगाशी हात लपेटून लाजेनं ओठंगुन ती क्षणभर उभी राहिली.
ओलसर पाय अलगद उचलून ती चालू लागली. नटखट वारा अवतीभवती रुंजी घालतच होता. नजर पुढे जाताच तिला दिसला निळाशार तलाव. त्या निळ्या दालनात कुणी असेल का? तिचं पाऊल क्षितिजाशीच थबकलं.
माथ्यावरच्या तलम निळ्या ओढणीतून तिच्या गालावरचा, फुलाच्या स्पर्शाने उमटलेला व्रण लक्ष वेधून घेत आहे. एक एक पाऊल अलगद टाकत ती येत आहे.
तिच्या नाजुक तनुवर लगडलेले केशरी गेंदेदार झेंडू आणि सोनेरी शेवंती असे रंग गंधाचे गहिरेपण बघून गुलाबाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि झेंडू-शेवंतीच्या टपो-या, टंच रुपाच्या बरोबरीने तोही मुसमुसून बहरला.
अशी रंग गंधात चिंब भिजलेली पहाट हलकेच फुलांची हनुवटी कुरवाळीत चालली आहे. गवतफुलांच्या, तृणपात्यांच्या कानात हळुच कुजबुजत चालली आहे. पण हे प्रेम वात्सल्य ममता वगैरे काही नाही हं! हे आहेत तारुण्याचे विभ्रम. यौवनातील प्रेमाचे लडिवाळ क्षण आहेत. असे हे इशारे सराईताला सुद्धा कसे कळावे?
अशी ही सुखद रोमांचित पहाट कवी मनाला जास्तच रोमॅटिक करते. नावात वसंत, पहाट शरदातली, आणि आश्विनातली पुष्पसृष्टी. अशी ऋतु-मास मीलनाने बहरलेली पहाट.
कवी वसंत बापट यांचा सेतु हा 1957 सालचा काव्यसंग्रह. ते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातले कवी. अत्यंत संवेदनशील अशा कविमनावर राजकीय, सामाजिक घडामोडींचा परिणाम होणे अपरिहार्य होते. स्वांतः सुखाय हे तत्व बहुजन हिताय या तत्वाने झाकून टाकले. त्या काळी वसंत बापट हे पोवाडे लिहिणारे व गाणारे म्हणून नावाजलेले होते. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, शिंग फुंकलेे रणी वाजतात चौघडे सज्ज व्हा उठा चला सैन्य चालले पुढे’ अशी स्फुरणदायी कवने खूप गाजली. शूरत्वाला आव्हान देणारी, पारतंत्र्याची लाचारी मानसिक दैन्य याने खचलेल्या अचेतन जनतेला गदागदा हालवून जागं करणारी त्यांची तेजस्वी धारदार लेखणी तळपत होती. वसंत बापटांनी दुस-या एके ठिकाणी म्हटले आहे, ” संघर्ष, लोभीपणा, मानसिक सुस्तपणा या आवर्तात सापडल्यामुळे जीवनातील मूलभूत आनंदाला आपण मुकतो. ” ह्याचा प्रत्यय म्हणजे
नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने नवे रुप धारण केले. कोमलतेला हलकासा स्पर्श करणारी, सृष्टीसौंदर्य शब्दात उलगडून मन ताजेतवाने करणारी कोमल कलम तारुण्याला साद देत होती. निसर्गाच्या स्पंदनांची जाणीव, मनाच्या अनेक स्मृती, अनुभव यांचे आगळे वेगळे रसायन त्यांच्या नंतरच्या कवितांतून आढळते. याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ” सेतु” ही कविता.
फुलातील फूलपणा तर आहेच, पण त्या बरोबर त्याच्याशी संलग्न अशी जाणीव मनात घर करते.
कवितेत शब्द सहज समजणारे. वाचताना जाणवते की, ” ह्या जागी हेच शब्द, ह्यापेक्षा दुसरा चपखल शब्द असूच शकत नाही “. बघा ना!……’तरणीताठी पहाट ‘, ‘राजविलासी स्नान’ , ‘ आरसपानी कांती ‘, ‘ ओठंगुन उभी ‘, ‘ वारा नखर’, ‘ फलचुखिचा व्रण’, ‘ गुलाब ईर्षेने मुसमुसले’, अशी सुंदर शब्द रर्त्ने. इतके तरल आणि पारदर्शी शब्द, असं वाटतं की, लिहिताना पेनातून शाईऐवजी दवबिंदू तर टपकत नाहीत ?
प्रत्येक ओळीतून एकेक भावनावस्था प्रकट होते. अरूणोदय हा नेहमीच पूज्य, आराध्य वाटतो.उगवते सूर्यबिंब दिसताच नकळत हात जोडले जातात.पण इथे तर कवीने हाच अरूणोदय इतक्या नर्म, संयमी,शृंगारिक भावनेने व्यक्त केला आहे. शृंगार रसाला एका उच्च आणि स्वच्छ, शुद्ध पातळीवर नेऊन ठेवलं आहे. हेच या कवितेचे मर्म आहे.
रात्र संपून पहाट होता होता एक सौंदर्याकृती आकाराला येते.एक निसर्ग चित्र तयार होते आणि कलमरूपी कुंचला खाली ठेवता ठेवता कवीला ती पूर्वस्मरणीय घटना वाटते, आणि चित्रच बदलून जाते. एक सजीव सौंदर्य डोळ्यासमोर येते आणि कवीमन थबकते. डोळे विस्फारून पहाटेकडे अनिमिषतेने बघतच रहाते.अशाच पहाटे ” तिला” पाहिले होते. क्षणभरात पहाटेचे ते दवांनी भिजलेले गारव्याचे स्मृतिक्षण रोम रोम पुलकित करतात आणि शब्द उतरतात,
” ही शरदातिल पहाट? …..की…….ती तेव्हाची तू?
तुझिया माझ्या मध्ये पहाटच झाली सेतु?”
एका झंझावाती, मर्द मनाच्या कवीची अगदी नाजुक आणि सुंदर कविता ” सेतु ”
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈