सुश्री अरुणा मुल्हेरकर
काव्यानंद
☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.
रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.
सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.
सौ राधिका भांडारकर
☆ स्वत्व ☆
*
नकोच वाटते मला दया माया
आहेत वाटा कितीतरी अजून
चालेन त्यावर जरी एकटी मी
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
*
सारे मुखवटे भासतात मजला
का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?
कशाला व्हावे मिंधे कुणाचे
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
*
नको लाचारी वा हाजी हाजी
प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून
मन्यात आहे सळसळता प्रवाह
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
*
खोट्यापुढे का तुकवायची मान
मुलाम्याला का जायचे मोहून
स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
*
आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी
केले कुणी तर त्यांना डावलून
सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
*
ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.
नकोच वाटते मला दया माया
आहेत वाटा कितीतरी अजून
चालेन त्यावरी जरी एकटी मी
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.
सारे मुखवटे भासतात मजला
का घ्यावे मी दान त्यांच्याकडून
कशाला व्हावे मिंधे कुणाचे
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,
नको लाचारी वा हाजी हाजी
प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून
धमन्यात आहे सळसळता प्रवाह
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.
खोट्यापुढे का तुकवायची मान
मुलाम्याला का जायचे मोहून
स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!
आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी
केले कुणी तर त्यांना डावलून
सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला
जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून
या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.
या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.
राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.
वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.
यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.
दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही
‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈