सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ नाते स्वतःशी – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

समाजात वावरत असताना कधी कधी आपणही नकळत एक मुखवटा चढवलेला असतो. अनेकांच्या मुखवट्यासोबत तोही वावरत असतो. आपल्या मनात नक्की काय चाललं आहे हे इतरांना कळू नये म्हणूनही असेल कदाचित ही यातायात पण कधीतरी हा बुडबुडा फुटतो आणि अजाणता आपलाच आपल्या मनाशी संवाद घडतो. मनात अनेक प्रश्न उभे राहतात. का? कशाला? का मी या सगळ्यातून स्वतःला सोडवू शकत नाही आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक सूक्ष्म मानसिक परिवर्तन, बदल, एक ठाम निर्णय, ठोस भूमिका.

अशाच अर्थाची माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची नाते स्वतःशी ही गझल वाचण्यात आली आणि रसिक काव्यप्रेमींपुढे त्याची रसात्मकता मांडावी असे तीव्रतेने वाटले म्हणून हा लेखनाचा अट्टाहास…

सुश्री अरुणा मुल्हेरकर

 नाते स्वतःशी ☆

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला

*

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

हे डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला

*

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

*

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

*

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

*

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

*

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी

कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला

*

— गझलकारा अरुणा मुल्हेरकर, मिशिगन

ही गझल प्रातिनिधिक स्वरूपात आहे असे म्हटले तर काहीच गैर ठरू नये. सारं काही जणू आपल्याच मनातलं आहे अशी भावना वाचकाच्या मनात ही गझल वाचताना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथेच, याच क्षणी गझलेतला अस्सलपणा जाणवतो.

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच मुखवटे मी पाठी पळू कशाला

मतल्याची सुरुवातच फार परिणामकारक झालेली आहे. जगता जगता एक क्षण असा काही येतो की साऱ्यांचाच उबग येतो. अवतीभवती वावरण्यार्‍यां विषयी शंका निर्माण होतात. काहीतरी चुकतंय, नको असलेलं पुन्हा पुन्हा आपल्यापाशी येऊन ठेपतंय आणि “पुरे झाले आता” अशी भावना निर्माण होऊन आपल्याच मनाला समजवावं लागतंय. “अरे! हे सारं किती फोल आहे, पोकळ आहे! यांच्या मुखवट्यामागची अव्यक्त गढूळ वृत्ती जाणल्यानंतरही मी त्यांच्यात का गुंतून पडू? कशासाठी मी या फसव्या लोकांच्या पाठीमागे पळत राहू?

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला 

अधरावर अमृत आणि उदरात मात्र जहर. यांच्या गोड बोलण्याला मी का खरं समजावं? जरी त्यांची वाणी मधुर असली तरी ती खोटी आहे, कावेबाज आहे हे मी जाणलंय. हे सारेच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. हे सारे गोड बोलून माझा फायदा घेणारे आहेत. यांना माझ्याविषयी जराही आत्मीयता नाही. सारेच मतलबापुरते माझ्या भोवती आहेत. “गरज सरो ना वैद्य मरो” हेच यांच्या मनातलं कडवट वास्तव मला माहीत आहे आणि हे मी पूर्णपणे जाणल्यानंतरही मी माझी फसवणूक का करून घेऊ? 

या शेरात गझलकाराने वापरलेला डोंगळे गुळावर हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे. खरंच यालाच दुनियादारी म्हणतात. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत प्रधान आहे. राज्य गेलं की सगळ्यांची पाठ फिरते. स्वार्थापुरते सारेच जवळ येतात. अशा लोकांची साथ नेहमीच अशाश्वत असते. डोंगळे गुळावर या दोनच शब्दातून कवयित्रीने हेरलेला जगाचा स्वभाव स्पष्टपणे व्यक्त होतो.

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

गणगोत, नातीगोती, त्यातले भावबंध जणू काही आता संपलेत. जो तो स्वतःत मशगुल आहे. प्रेम, आपुलकी, आस्था, माया, उपकृतता, कर्तव्य काही काही उरले नाही. जो तो स्वतःत मग्न आहे. इतरांचा विचारही करण्याची त्याला गरज वाटत नाही. नात्यातून जाणवत असलेला हा कोरडेपणा कवयित्रीला अक्षरशः व्यथित करत आहे. हा बदल अनपेक्षित आहे. धक्का देणारा आहे पण तरीही हे वास्तव आहे आणि या वास्तविकतेने मन विदीर्ण झाले असतानाच कवयित्रीच्या मनात सहज येते…

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या राजहंसाचे चित्र कवियत्रीच्या मनात साकारते. त्याच्याशी नकळत तुलना केली जाते.

“पहा! कसा हा राजहंस पक्षी स्वतःच्या धुंदीत स्वैरपणे विहरत आहे. त्याचं नातं फक्त भोवतालच्या अथांग, निर्मळ, पवित्र जलाशयाशी आहे आणि पाण्याचा निर्मळ, निरपेक्ष स्पर्श म्हणजेच त्याच्यासाठी जणू काही स्वर्गीय आनंद आहे. ”

संपूर्ण गझलेवर कळस चढवणारा हा शेर आहे. या शेरात राजहंस— पाणी हे रूपकात्मकतेने वापरलेले आहे. पाणी म्हणजे जीवन. माणूस आणि जीवन यांचा संबंध उलगडणारं हे रूपक अतिशय प्रभावी वाटतं. “जगावं तर राजहंसासारखं! जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जीवनात वेचावा. ” हा अत्यंत मोलाचा संदेश या शेरातून मा. अरुणाताईंनी किती सहजपणे दिला आहे! 

स्वत:शी संवाद साधता साधता आता कवयित्रीच्या मनात काही निर्णयात्मक विचार येऊ लागले आहेत. त्या आता स्वतःला सांगत आहेत,

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही 

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

आता जगायचं ते मुक्त, स्वच्छंद, स्वैर बंधन मुक्त, नको बेड्या, नको शृंखला. कशाला ज्यातत्यात अडकून नैराश्य येऊ द्यायचे आणि उरी जखमा करून घ्यायच्या? या संकुचित, आक्रसलेल्या, गढूळलेल्या, जीवनरुपी डबक्याचा त्याग करून उंच, मोकळ्या, अथांग, गगनी मुक्त झेप का न घ्यावी? खरोखर अशा या भरारीतल्या अनमोल सुखालाच मला आता कवटाळायचं आहे.

किती सुंदर शेर! किती लयबद्ध आणि अर्थपूर्ण! हा शेर वाचताना मला सहज गदिमांच्या ओळी आठवल्या.

जोड झणी कार्मुका 

सोड रे सायका 

मारही त्रटिका रामचंद्रा..

प्रस्तुत गझलेतल्या ओळी आणि गदिमांच्या या ओळीतले अर्थ, प्रसंग, वातावरण निराळे असले तरी आवेश तोच आहे. काहीतरी सोडताना, तोडताना मग ती जगण्यातली बंधने का असेनात पण त्यासाठी एक आवेश लागतो, जोश लागतो आणि तो व्यक्त व्हावा लागतो आणि वरील शेरात तो याच ताकदीने व्यक्त झालेला मला जाणवला.

आता अरुणाताईंची गझल पुढे सरकते..

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

वा क्या बात है!

हा शेरही रूपकात्मक आहे. सूर्यास्त, मावळता दिन, पानगळ हे शब्द संपत आलेल्या जीवनाविषयी सांगत आहेत. “एक दिवस हे जग सोडून जायचंय. सूर्य मावळण्याची चिन्हं क्षितिजावर उमटत आहेत, या जीवनरुपी वृक्षांची पानं गळून जात आहेत, हळूहळू हा वृक्ष निष्पर्ण होईल, गात्रे थकली.. ती आता केव्हाही निस्त्राण होऊ शकतात. ”

या शेरामध्ये कवयित्रीची जीवनाच्या अंताविषयीची एक स्वीकृती तर जाणवतेच पण शब्दांच्या पलीकडचं, त्यांच्या मनातलं काहीतरी सहजपणे वाचता येतं. आता कशाला? हा एक सूर त्यात जाणवतो. संपतच आलं की सारं आता! जे काही शेवटचे क्षण उरलेत ते तरी मुक्तपणे मनासारखे का जगू नयेत? याच भावनेतून त्या त्यापुढे म्हणतात..

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला या क्षणी, या सांजवेळी, आयुष्याच्या या किनारी मी माझ्याच मनाशी साधलेला हा संवाद आहे. माझ्या मनाशी जुळवलेले माझे हे निखळ नाते आहे. माझ्या भोवती मीच विणलेल्या या कोषातून मुक्त होऊन मी माझ्या मनातले काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ”

जणू काही या ओळीतून अरुणाताई काहीतरी निर्वाणीचं सांगत आहेत. ते जरी निर्वाणीचं वाटत असलं तरी ते निर्णयात्मक आहे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला असा भाव कुठेतरी या ओळीतून उलगडतो.

अप्रतिम गझल.

मी दूरस्थपणे गझलकाराची मानसिकता टिपण्याचा फक्त प्रयत्न केला आहे. या गझलेला असलेली एक तात्त्विक बैठक शोधण्याची धडपड केली आहे. सुरुवातीला ही गझल काहीशी नकारात्मक भासत असली तरी हळूहळू ती सकारात्मकतेकडे झुकत जाते. जीवनातले अस्सल अर्थ उलगडत जाते. आनंदकंद वृत्तातील ही मुसलसल गझल मनाला भिडते ती त्यातल्या सहज, सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांमुळे. प्रत्येक शेरातला उला आणि सानी यात अर्थाची सुरेख सरमिसळ झालेली जाणवतते. स्पष्ट राबता आणि सुरेख खयालत यामुळे ही गझल फारच परिणामकारक झाली आहे. रदीफ विरहित आणि मनाला कशाला स्वतःला कुणाला त्याला सुखाला झाला जगाला या काफियांनी गझलेची रुची आणि उंची अधिक वाढलेली आहे.

या गझलेचा आनंद आपण सर्वांनी जरूर घ्यावा हीच अपेक्षा..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments