डॉ. निशिकांत श्रोत्री
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ वेदना तुझ्या देई मला… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
माझी प्रिय, पत्नी कै. अपर्णा हिच्या पोटातील कर्करोगाचे निदान झाले आणि माझ्या पायाखालील वाळूच सरकली. तरीही भावनांच्या आहारी खचून न जाता तिची सर्वतोपरी काळजी घ्यायचा निश्चय मी केला. वास्तविक आमचे दोन देह होते तरी आमच्या आत्म्यांनी केव्हाच अद्वैत साधले होते. आता तिला पुढे कधीतरी खूप वेदना होणार हे मी स्वतः डॉक्टर असल्याने समजून मी खूप विचलित होत असे. अशाच मानसिक अवस्थेतील एका क्षणी माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले:
☆ वेदना तुझ्या देई मला ☆
☆
वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा
जगता जीवन अद्वैताचे विसरुयात आपदा||ध्रु||
*
सोडिली माहेरची माया सासरी तू येउनी
फुलविली तू प्रीत माझी हृदया जवळ कवटाळुनी
दाटल्या मळभावरी तू फुलविली सुमने कितीदा
वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||१||
*
फुलविली तू बाग संसारात माझ्या आगळी
दरवळोनी गंध धुंदी पसरली किती वेगळी
पुष्प अपुली फुलुनी आली मोद देती सर्वदा
वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||२||
*
एकेक पाकळी फुलावितांना भोग होते कष्टदा
हंसुनी तरी आनंदली तू पाहुनिया संपदा
संसार अपुला तू तयासी होतीस शुभ गे वरदा
वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||३||
*
जगतास साऱ्या स्मितमुखे झालीस गे तू ज्ञानदा
निरामयाची क्लेश मुक्ती झालीस तू आरोग्यदा
हंसत राही सर्वकाळी आहेस तू आशीषदा
वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||४||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈