मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ हवंच सारं सोसायला’ या कविते विषयी…. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचा ☆ हवंच सारं सोसायला’ या कविते विषयी…. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 


परवा भाजी आणायला गेले होते.
मी चमकून मागे बघितलं. बाई नमस्कार. मी सिद्दीकी … ओळखलत का?’

अगं किती बदललात तुम्ही! कशा ओळखणार?’ असं म्हणता म्हणता एकदम ओळखलं तिला. आमच्या कॉलेजची ७७- ७८ सालची विद्यार्थीनी. मोठी विनयशील मुलगी. सोशल डिस्टनिंग होतं म्हणून दुरून हात जोडून नमस्कार. एरवी भर रस्त्यातसुद्धा पायावर डोकं ठेवायला संकोचली नसती.

इथेच असतेस का?’

नाही ढालगावला. सहा महिन्यापूर्वी रिटायर्ड झाले. मुलगा इथे आय. सी. आय. सी. आय. बँकेत असतो. गेल्या वर्षीच बदलून आलाय. सी.ए. केलाय त्याने आनंद, सुख, तृप्ती तिच्या देहावरून निथळत होती जशी. तिच्याबरोबर तिचा चार-साडे चार वर्षाचा गोंडस नातू होता.

इतरांना शिकवणार्‍या आपल्या आजीलाही शिकवणार्‍या कुणी मॅम आहेत, या विचाराने काहीसा गोंधळून, विस्फारीत नेत्रांनी माझ्याकडे पहात तो गुडमॉर्निग म्हणतो.

हा माझ्या पहिल्या मुलाचा मुबारकचा मुलगा॰ कॉलेजमध्ये असताना डिलिव्हरी नव्हती का झाली!

बाई, घरी या ना! ती आग्रहाने म्हणाली. मुलाला गाडी पाठवाया सांगते. बघू. कधी जमतय. मी फोन करते. मी म्हंटलं. त्यानंतर खूप काही बोलून आम्ही दोघी आपआपल्या वाटेने निघालो. परतताना तिचेच विचार मनात रेंगाळत होते.

सिद्दीकी आमच्या डी. एड. कॉलेजची ७७-७८ च्या बॅचची विद्यार्थिनी. मोठी विनयशील. ती भेटली आणि कॉलेजचे ते दिवस पुन्हा आठवले. विशेषत: तो दिवस आणि तो प्रसंग.त्या प्रसंगाने माझ्या एका कवितेला जन्म दिला होता.

सिद्दीकी नुकतीच बाळंतपणाची राजा संपवून कॉलेजमध्ये येऊ लागली होती. कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात अध्यापन होई आणि दुपारी विद्यार्थिनींचे सराव पाठ होत. त्यांच्या पाठ-सरावासाठी नगरपालिकेच्या वागवेगळया शाळा घेतल्या जात. एका वर्गात 3-4 जणींचे पाठ असत. प्रत्येक वर्गावर एकेक अध्यापक पाठ निरीक्षणाचे काम करीव नंतर पाठाबद्दल चर्चा होई.

नगर पालिकांच्या अनेक शाळांची स्थिती त्या काळात बरीच दयनीय होती. अनेक ठिकाणी वर्ग खोल्यात फरशीही नसे. शेणाने सारवलेली जमीन असे. बर्‍याचदा ती उखणलेली असे. विद्यार्थीच अधून मधून ती सारवत.

,‘बाई मी घरी जाऊ?‘ त्या काळात आम्ही अजून बाईच होतो. मॅडम झालो नव्हतो. मी म्हंटलं का ग? निरीक्षण नाही करणार?’

बाई बाळाला ताप आलाय. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तिच्या आठीवरून हात फिरवत तिला धीर दिला आणि घरी जायची परवानगी दिली. ती घरी गेली, पण तिच्या आईपानाके विचार माझ्या मनातून काही जाईनात. इतर पाठ बघता बघता तिच्या आईपणानेच मन-विचारांचा ताबा घेतला आणि एक कविता सुचत गेली. घरी जाईपर्यंत ती पूर्णसुद्धा झाली. शीर्षक दिलं- हवच सारं सोसायला

अबोल फळा संस्कारशून्य

, पोपडे उडालेल्या

उखणलेली जमीन

झाली आहे सारवायला

निर्विकार निरीक्षक

काक दृष्टीचे

चष्म्याच्या भिंगातून

वर्मावर बोट ठेवणारे

,

, पाय पसरून

फळ्याकडे पाठ फिरवून

ओरडत किंचाळत

एकमेकांना मारत पिटत

( वाटतं आहे एक द्यावी ठेवून )

पण आवाजाला उसने मधाचे बोट लावीत

प्रेमळ स्वरात ( शक्य तितक्या )

, विनवते आहे

दंगा करू नका म्हणून

तुमच्या घरातली आवडती व्यक्ती

हे सारं आवश्यकच आहे

प्रस्तावना अन् हेतूकथन,

मुलांशी प्रेमळ वर्तन

‘-बपासून +ब पर्यन्त मजल मारण्यासाठी

( कारण तेवढेच आहे औदार्य बाईंचे)

आज आपण आईची थोरवी पाहू या.

म्हणेल का बाळ मोठा झाल्यावर

आई आवडते म्हणून

रोजच त्याला येते रडवून

आता उठला असेल कदाचीत्

विसावला असेल

कुणा हिच्या तिच्या कुशीत

बोलणं विचूक होतय

बाईंच्या नजरेत अंगार फुलतोय.

, सारं सारं सोडून

घरी जावं निघून

प्रतिपादन अन् मूल्यमापन

सारं सारं सोसायला हवं

मन आवरायला हवं

आणखी काही दिवस तरी

पुढल्या वर्षीच्या

मिळू घातलेल्या नोकरीसाठी

आणि काहीशे रुपयांसाठी.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈