मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

जून  महिन्यातील  असाच  एक  दिवस. संध्याकाळचे  चार वाजून गेले असावेत . आज सकाळपासूनच  आभाळ जड  झालयं. काळंभोर, घनबावरं झालयं. कोसळू पाहतंय  पण  कोसळत नाहीय. इथं , कोईमतूर मध्ये मी घरी एकटीच . मुलगा  आणि  सून  ऑफिसला गेलेत. नातूही दुपारचा झोपलाय . खिडकीतून दिसणारे काळे जडावलेले ढग बघत बसलेय मी . मोरही अगदी  सहज  फिरताना दिसतात या बाजूला . त्यानंही केकारव केला . अरे! हा तर थिरकू लागला !! बघता बघता पावसाचे टपोरे टपोरे  थेंब येऊ  लागले . थेंबांच्या सरी झाल्या . धो धो कोसळू लागल्या . मन  तर बालपणीच्या  अंगणात  जाऊन गारा  वेचून आलं . . . . परकरपोलक्यातून केंव्हाच सटकलं . . . मैत्रिणींच्या बरोबर नाचू लागलं. . .

सरींवर सरी कोसळू लागतात

आठवणींचे मोती सरीत गुंततात

अगबाई . . लग्नंही  जूनमधलचं. . त्याही दिवशी असाच  पाऊस . . .  आता सरींचे  हिंदोळे झाले . चांदणफुलांनी त्याची माझी ओंजळ  भरली. . . थांब, थांब ना जरा. . .

अंबरातून सावळघन बरसताहेत

मनजलधित तरंग उठताहेत

आता अनेक आठवणी, अनेक साठवणी. . .

उडून गेलेली छत्री, झालेली फजिती. .

ऊटीच्या थंडीतही पावसात भिजत खाल्लेलं आईस्क्रीम. . . .

आठवणींचे तरंगावर तरंग. पाण्यात दगड टाकल्यावर ऊठावेत तसे.

मनाच्या डोहात किती वलयं उठतायत. एकात एक, पुन्हा त्यात एक.. . एकाच केंद्राभोवती. . . की. . की प्रत्येकाचा केंद्र बिंदू निराळा? माझं मन हे केंद्र बिंदू प्रमाणं समजलं तर समकेंद्री . पण असंख्य जीवनाभुवानं वेगवेगळ्या क्षणी मला बहाल केलेल्या स्मृती . . विकेंद्री!!

आठवणी काही आनंदाच्या,  काही माझ्याच जीवनवेलीवरील फुलांनी दिलेल्या समाधानाच्या. .

हे काय सरीतील मोती अजूनही ओघळतच आहेत. . . . स्वैर. . . . बेबंद. . . आणि हा वेडापिसा झालेला मोर तर , मान उंचावून; निळाभोर होऊन; आनंदघनात चिंब झालाय.

. . . . . . मी ही एक गिरकी घेतली. मीच मला टाळी दिली. गदिमांच्या थुई थुई नाचणारा निळा सवंगडी मनाच्या अंगणात पदन्यास करु लागला.. . . . .

तशी मी बाथरूम सिंगरही नाही. पण आज या आठवणींच्या सुरावटीनं माझं गाणं ही सुरेल झालंय. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर उठणारे तरंग आजूबाजूला ऊबदार, सुखद तशाच ‘Positive vibes’ पसरवताहेत. . . . माझं आनंदगान घननील  नभापर्यंत उंच उंच झेपावतय.

सरींवर सरी

सरींवर सरी कोसळत  राहतात,

आठवणींचे मोती सरीत गुंततात,

सरींचे हिंदोळे अंबरी झुलतात,

चांदणफुले वेचून मने डोलतात,

अंबरातले सावळ घन बरसतात

मनजलधित तरंग ऊठतात,

तरंगांची वलये तनमनात झरतात,

वलयांची कंपने झंकारतात,

सरींचा ताल पकडून,

थेंबांचा ठेका धरून,

हिंदोळ्यांच्या लयीत,

आठवणींच्या सरीतील थेंबांचे मोती,

स्वैर बेबंद ओघळत राहतात __. . . . . .

मनमोरही आता धरतो ताल

ऐटीत लहरते एक अल्लड चाल

केकावलीची तानही थिरकते सुरेल

सरींची लकेर घेऊन मनगीत भिजते सचैल !!!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

? – 9665669148

[email protected]

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈