चित्रकाव्य
नाही चिरा… नाही पणती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री प्रमोद जोशी आणि श्री आशिष बिवलकर ☆
☆
श्री प्रमोद जोशी
( १ )
दगड झिजे जो मंदिराप्रति,
लावू कसा मी त्याला पाय?
गरीब आहे म्हणून का हो,
श्रद्धा माझी गरीब काय?
☆
घाव छिन्नीचा होई मनावर,
दगडावर पण होई नक्षी !
जे-जे करतो ते-ते केवळ,
श्रीरामांना ठेवून साक्षी !
☆
श्वास रोखूनी येतो थकवा,
जरा न व्हावी कुठली चूक !
गुंते इतके मन या कामी,
देह विसरूनी जातो भूक !
☆
इथे कुणा ना प्रवेश सहजी,
तिथे मला सगळे राखीव !
बहुधा मी प्रिय राघवासही,
हातुन काम घडे रेखीव !
☆
हातोडीसह माझी छिन्नी,
जणू पुजेची गंध,फुले !
बापही मंदिर बांधायाचा,
तेच करो माझीही मुले !
☆
मंदीर जेव्हा होईल पूर्ण,
दर्शनाची ना मिळेल संधी !
सेवा ही माझ्या प्रतिभेची,
म्हणून माझा घाम सुगंधी !
☆
दगडाचेही सोने होईल,
दिसेल सोने दगडावाणी!
प्रतिष्ठापना होईल तेव्हा,
असेन तेथे भिजो पापणी !
☆
“नाही चिरा नाही पणती” ही,
माझ्यासाठीही असेल ओळ !
शुचिर्भूतता कुठे एवढी,
रोजच घामाने आंघोळ !
☆
कवी : प्रमोद जोशी. देवगड.
मो. 9423513604
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्री आशिष बिवलकर
(२)
प्राण फुंकतो या दगडात,
करतोय कोरीव नक्षीकाम !
शतकांच्या वेदना कोरल्या मनी,
आयोध्येत विराजती श्रीराम !
☆
रामकार्याची एक एक शिळा,
करतो तिला मनोभावे वंदन !
बसलो जरी तिच्यावर कोरत,
पायाखाली ठेऊन श्रद्धेने किंतन !
☆
रामकार्यात योगदान माझे,
खारीचा वाटा मी उचलतोय !
सार्थक या जन्माचे झाले,
मंदिराची शिळा कोरतोय !
☆
उन-पाऊसाची नाही तमा,
नाही लागत भूक तहान !
घरदार संसार दूर राहिला,
ध्येयपूर्तीसाठी विसरुन भान !
☆
एकीकडे शरयू वाहते आहे,
दुसरीकडे अंगातून घामाच्या धारा !
शरयूलाही हेवा वाटतो आमचा,
हृदयातल्या रामनामात उगमाचा झरा !
☆
देतो मज हत्तीचे बळ,
परम रामभक्त हनुमान !
राम भक्तीत तल्लीन झालो,
एक एक घाव गाई गुणगान !
☆
एक एक शिळा झेलतेय,
हसत छिनी हातोडीचे घाव !
कृतार्थ होई निर्जीव शिळाही,
दुमदुमते तिच्यातून रामाचे नाव !
☆
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे,
मंदिर आकारतेय येथे भव्य !
हिंदू धर्माची भगवी पताका,
झळकेल तेज तिचे दिव्य !
☆
स्वर्गात सुखावले पितर ,
हातून घडतेय रामाची सेवा !
सातजन्माचे पुण्य पणाला,
हातून घडो अजरामर कलेचा ठेवा !
☆
साकरेल भव्यदिव्य मंदिर,
रामरल्ला गाभाऱ्यात विराजमान !
सोनियाचा दिवस उजडेल,
हिंदुस्थानची शोभेल आन बान शान !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈