सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
☆ ओंजळीतून प्रकाशकिरण…
☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
हुशार कोण आहे सगळ्यात
सृष्टीने परिक्षेचे ठरवले
हुशार झाली सारीच लेकरे
प्रश्न ऐकण्या उताविळ झाले॥
☆
मोल दिले तिने प्रत्येकालाच
तेवढ्यात सृष्टी व्यापण्या कथिले
मोल आले चराचराला आणि
प्रत्येकजण कामास लागले॥
☆
नाना गोष्टी घेतल्या त्या पैशाने
सारे काही त्यांनी आजमावले
नाना चा पाढा वाचला सार्यांनी
कोणा सृष्टी व्यापण्या न जमले॥
☆
मित्र आला तेजाने चमकून
सृष्टी व्यापली पैसेही वाचले
मित्र आपला केवढा हुशार
त्यास नारायण मानू लागले॥
☆
जग असेच तू पण माणसा
कर्तृत्वाने निघावे उजळून
जग जाईल मग मोहरून
टाकेल जीव पण ओवाळून॥
☆
कर दान सारे मुक्तहस्तांनी
ठेऊन भान भविष्यकालाचे
कर राहती भरलेले तरी
कमी कधी काही ना पडायाचे॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈