सौ. दीपा नारायण पुजारी
चित्रकाव्य
– काठी आणि करंगळी –
☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
☆
ठसा उमटवित पाऊले चालली
अनुभवी काठी मुठीत ठाकली
सान काया कुंतल कुरळे
बाल्य अल्लड अबोध झबले
वस्रं धवल वार्धक्य ल्याले
झुलते शैशव झालरवाले
थकल्या हाती करंगुली इवली
किती विश्वासे तिजला धरली
हरले वय गात्रेही थकली
झेलून गाठी पाठी वाकली
आजीच्या अनुभवांची बोली
कथते ती सुरकुत्यांची जाळी
सायीसम कर तो सानुला
थोरलेपणा होई हो धाकुला
कसली थरथर, नसेच काहूर
बीज पल्लविता नच हुरहूर
छोटी आशा स्वप्नील नयनी
तरल भावना अनवर वदनी
भविष्यातले षड्ज उद्याचे
काठी स्वरे पंचम पाचूचे
चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈