सौ. विद्या पराडकर
चित्रकाव्य
– वृक्षराज… – ☆ सौ. विद्या पराडकर ☆
हे वृक्षराज,
तुज सगुण म्हणू की निर्गुण
तुज जीवनदाता म्हणू की ,जीवन
ज्ञानदाता तू की ज्ञानदास
कर्मयोगी तू की कर्मदास !
आपुले नाते युगायुगाचे
शिष्यत्वाचे, गुरुत्वाचे
दीपस्तंभ तू आदर्शाचे
लेणे असे तू बहुमोलाचे !
तन मनाने तू श्रीमंत
पाहुनी वैभव चकित आसमंत
गुण पाहून तुझे दाटे उर
कृतज्ञतेने येई नयना पूर !
वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरी
बोलली तुकारामाची वैखरी
वृक्षराज तू छत्र माऊली
लेकरांवर करी मायेची सावली !
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈