श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– दीन-बालपण…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
निरागस असे बालपण,
यांचे असे कसे हरवले !
नियतीच्या जड जात्यात,
कमनशिबानेच ते भरडले !
☆
किती निखळ हास्याचे
चेहऱ्यावर असती भाव !
कौतुक नसे त्याचे कुणा,
निर्भत्सना यांनाच ठाव !
☆
आशाळभूत नजरेने कसे
जगाकडे आशेने पाहती !
जुन्या-पान्या, मळक्या,
चिंध्यानीच शरीर झाकती !
☆
उकिरड्यावर खांद्यावर
घेऊन मळक्या पोत्यात !
नशीबाचे भोग जणू ते,
एकेक करून वेचतात !
☆
डोक्याला सुगंधी तेल सोडा,
प्रेमाने अंघोळ कुणी न घाली !
हेटाळणीच चाले चिमुरड्यांची,
म्हणे आले भावी गुंड मवाली !
☆
कोटाला गुलाबाचं फूल लावून,
चाचांना लहान मूल फार आवडे !
अमृत महोत्सवाच्या या अमृताला,
या चिमुरड्या जीवांचे असे वावडे !
☆
आपली मुलं खांद्यावर घेऊन
साजरा करू बालदिन सर्वजण l
समाजात कुठे तरी जगत आहे,
हरवलेलं असं दीन बालपण !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈