सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– चक्षू –
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
☆
चर्येवर ते अतीभाव दाविती
मुकेपणातही बोलून जाती
हर्षानंदात सहज चमकती
आर्ततेत अश्रूथेंब ढाळिती..
☆
सोह्रद सोबतीत मिश्कील हसती
स्नेहात सुकर सौमनस्य भासती
स्थिरावूनी मुखास अलंकृत करिती
मुद्रेवरची सौंदर आभूषणे ठरती..
☆
अचंबीत होती भृकुटी उंचाविती
उद्वेग क्रोधात लालिमा सांडती
तिरळेपणात कुणी चक्रावती
न वदताही सापेक्ष अर्थ दुणाविती..
☆
स्वप्नरंजनात हरपूनी लपलपती
निद्राझोतांत अलगद मिटूनी जाती
कुणी मयूराक्षी हरिणाक्षी म्हणविती
मनोहारित दिलखेचक ललना ठरती..
☆
विद्वत्तेची दार्शनिक तेजोमय दिप्ती
उद्दाम दिमाखात तोराही मिरविती
नेत्र डोळे त्यां चर्मचक्षूही म्हणती
अंतरातले ते मर्मगवाक्ष खोलती…!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈