चित्रकाव्य
चित्र एक… काव्ये दोन… (१) संस्कार संस्कृतीचा… (२) बदलता काळ… ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆
☆
सुश्री नीलांबरी शिर्के
– संस्कार संस्कृतीचा… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
उपचार म्हणून सण करता
हळू संस्कृती लयास जाते
घरात गोडधोड होतेच पण
सण मात्र इव्हेंट बनते
*
गुढीवरचा कळस उन्हात
सोन्यासारखा चमकतो
कडुलिंबाचे पानही हळूच
साखरगाठीशी मैत्र करतो
*
आयुष्यातले गोड कडवट
एकमेकाला साथ देतात
तांब्याच्या स्वस्तिकाला
शुभ चिन्ह जतन करतात
*
सणामागील विज्ञानाला
विचार करू ,समजून घेऊ
जतन करून पुढच्या पिढीस
संस्कार संस्कृतीचा वसा देऊ
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
– बदलता काळ… –
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
उंच आकाशास साद घालणारी गुढी,
वन बी एच के मध्ये सजते |
कशाला सोसाव्या उन्हाच्या झळा,
घरामध्येच सावलीत ती लपते |
*
बदलला काळ,
बदलली जगण्याची शैली |
ना राहिली रीतभात,
ना उरली माणसं आपली |
*
किलो किलो चक्का फेटून,
भांडभर करत नाही श्रीखंड |
शुगर बीपी कोलेस्ट्रॉल यांनी,
आखलेत खाण्याचे मापदंड |
*
मोबाईल भरतो शुभेच्छांनी,
पण भेटायाला नसतो वेळ |
बंद दार संस्कृती आत्ताची,
सृजनशीलतेचा लागेना मेळ |
*
गतिमान जीवन पद्धतीत,
उत्सवाची औपचारिकता उरलीय |
पाश्चिमात्यांचे अनुकरण सर्रास,
संस्कृती हळू हळू लोप पावतीय |
*
सनातन हिंदू धर्म आपला,
सण वार उत्सवांना मांगल्याचे स्वरूप |
विसरून कसं सारं चालेल,
हिंदू प्राचीन जीवनपद्धतीचे प्रारूप |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈