श्री सुहास सोहोनी
चित्रकाव्य
– स्थितप्रज्ञ – ☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
वर्षे सरली, युगे उलटली,
काळ किती लोटला
स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत
शिलाखंड एकला
सजीव प्राणी पक्षी त्यांसी
स्वर्ग, नरक अन् मोक्ष
निर्जीवांसी गति न कोणती
केवळ अस्तित्व
घडले नाही कधीच काही
उबूनि गेला जीव
अंतर्यामी आंस उठे परि
जिवास भेटो शिव
शिल्पकार कुणि दैवी यावा
व्हावी इच्छापूर्ती
अंगांगातुन अन् प्रकटावी
सुबक सांवळी मूर्ती
मोक्ष हाच अन् हीच सद्गती
निर्जीवाचे स्वत्व
छिन्नीचे घन घाव सोसुनी
लाभतसे देवत्व…
☆
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈