सुश्री नीलांबरी शिर्के
☆ जागे होई सारे विश्व ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
रविराजाच्या रथाला
प्रकाशाचे शुभ्र अश्व
रथ जाई पुढे तसे
जागे होई सारे विश्व
*
गोपुरात घंटानाद
घराघरातून स्तोत्र
किरणात चमकते
सरितेचे शांत पात्र
*
कुणब्याचे पाय चाले
शेत वावराची वाट
झुळुझुळू वाहताती
पिकातुन जलपाट
*
सुवासिनी घालताती
माता तुळशीला पाणी
सुखसौख्य मागताती
वैजयंतीच्या चरणी
*
शुभ शकुनाने होई
दिन सनातनी सुरू
रविराजाला वंदता
पंचमहाभूता स्मरू
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈