चित्रकाव्य
☆ निळासावळा सखा ☆ सुश्री निलिमा ताटके ☆
☆
उत्तररात्र नि पहाट,
यामधील गाफील वेळ.
गाव सारे झोपलेले,
मनात सल,अन् उरात, कळ.
कृष्णसख्याच्या भेटीची,
एकच एक तळमळ.
मुरलीचा घुमे नाद
माझ्या घराभोवताली.
निळासावळा सखा ग,
वाजवतो मंजूळ पावरी.
भान हरपुनी मी धावते.
घराबाहेर टाकिते पाय.
चंदनतुळशीचा सुगंध नि
मोरपिस अंधारी चमकून जाय.
माझ्यासाठी, माझ्याचसाठी,
आला होता तो वनमाळी
मंजुळ सूर नि अनुपम सुगंध
सोडून गेला माझ्यासाठी.
☆
छायाचित्र – सुश्री निलिमा ताटके.
© निलिमा ताटके
ठाणे.
मोबाईल 9870048458
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈